तिघांवर पॉक्सोसह गुन्हा
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
शैक्षणिक हब म्हणून ओळखल्या जाणार्या नाशिक शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाचा आणि विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाबाहेरून 16 वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तिघांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर (जि. धुळे) येथील 16 वर्षे 10 महिने वयाची पीडित विद्यार्थिनी 2 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाबाहेर होती. त्यावेळी आरोपी यतीश देवीदास जाधव (रा. पिंपळनेर) याने तिला पांढर्या रंगाच्या कारमध्ये बळजबरीने बसवून तिच्या इच्छेविरुद्ध कसारा घाट
परिसरात नेले.
तेथे विद्यार्थिनीने विरोध केला असतानाही आरोपीने तिच्याशी जबरदस्ती केली. तसेच तिचे छायाचित्र काढून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर तिला कॅनडा कॉर्नर परिसरातील एका मित्राच्या खोलीवर नेण्यात आले. या प्रकारात अनिकेत जाधव आणि चैताली दुकळे (दोघेही रा. पिंपळनेर) यांनी यतीशला मदत केल्याचे
पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून 18 ऑगस्ट रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरण, बेकायदेशीररीत्या डांबून ठेवणे, गुन्हेगारी स्वरूपाची धमकी तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पुढील तपास
करीत आहेत.
Abduction and molestation of a minor female student