– प्रणाली देशमुख
गॅसवर चहा ठेवल्यावर लक्षात आलं, साखर नाहीये डब्यात! पण काळजी नसावी, तलफ वाढण्याआधीच ऑर्डर टाकली की पाच-सात मिनिटांत साखर हजर. जादूने? नाही! ब्लिंकिट किंवा अशाच एखाद्या पला आज्ञा दिली की, समोरच्या दारातून हवी ती वस्तू तुमच्या हातात तयार.
हल्ली ‘हाकेच्या अंतरावर’ असणारं ब्लिंकिट पूर्वी ‘शेजार्याच्या’ रूपात होतं. घरी पाहुणे आले आणि चहासाठी दूध नसेल, तर रिकामा कप घेऊन शेजारी जायचं. स्वयंपाकघराच्या मागच्या दारातून गपचूप जाऊन, चहा उकळायच्या आत दूध चुलीजवळ असायचं. अंगणात पाण्याने भरलेली बादली आणि पाट दिसला की समजून जायचं, आज कुणीतरी बघायला येणार आहे! नवीन कपबशा, ताट-वाटीचे सेट, अशा कितीतरी वस्तू शेजार्याकडूनच येत. कोथिंबिरीच्या दोन काड्या, लिंबू, किंवा पीठ संपल्यावर मारलेली हाक… हे सगळं किती हक्काचं होतं. पाहुणे येताना नाही दिसले तर जाताना तरी बघता यावं म्हणून शेजारची काकू दारात उभी असायची. किती उत्सुकता होती ना? घराच्या भिंती फक्त लागून होत्या, पण मनाच्या भिंती पारदर्शक होत्या.
आता सगळं ‘इमर्जन्सी’मध्ये एका क्लिकवर आणि पैशांच्या मोबदल्यात मिळतं. गरज भागते, कष्ट वाचतात, पण ती देवाणघेवाण हरवली आहे. कदाचित पुढच्या पिढीला एखाद्या दंतकथेसारखं सांगावं लागेल की, कोण्या एके काळी रोजच्या पेक्षा वेगळी भाजी केली तर वाटीभर शेजारी देणे किंवा हक्काने जेवायला जाणे अशा पद्धती होत्या.
सहा-सात लोकांच्या कुटुंबात वाटीभर भाजीने कुणाचे पोट भरणार नव्हते, पण त्या अन्नात एक वाटा शेजार्याचाही असायचा. ‘अॅप्स’ भौतिक गरज भागवू शकतात, पण संकटकाळात धावून येणारी ‘माणूस’ नावाची यंत्रणा कोणत्याही पवर मिळत नाही. डब्यातली साखर संपली की वेळेत मिळते, पण हरवलेला गोडवा कोणत्याच क्लिकवर मिळत नाही. गच्च भरलेले डबे, भाज्यांनी भरलेला फ्रिज, महागडी क्रोकरी… पण शेजारी भाजी देत नाही आणि तिकडून
येतही नाही.
कुंडीतलं कडिपत्याचं रोपटं आता फक्त ‘आपल्यापुरतं’ झालंय, जे एकेकाळी अंगणातलं झाड होतं; कुणीही न विचारता जिथून पानं तोडून घेऊन जायचं. पुढच्या पिढीच्या अभ्यासक्रमात ‘वाटीभर भाजी’ आणि ‘कोथिंबिरीच्या काड्या’ हे धडे वाचताना मुलांना हे खरंच समजेल का? वाचतानाही मनात कालवाकालव होतेय, कारण हे सगळं आठवणींच्या कोपर्यात तसंच जपून ठेवलंय.
आणि हो, अजूनही आशा आहे कदाचित उद्या सकाळी, कुणीतरी हक्काने माझ्या दारावरची कडी वाजवेल आणि पुन्हा एकदा अंगणातल्या कडीपत्त्याच्या पानांचा सुगंध, शेजारच्या वाटीतल्या भाजीमध्ये दरवळेल.
A bowl of vegetables from the neighbor