द्वारका परिसरात खड्ड्यात मालवाहू टेम्पो अडकला

वडाळागाव : प्रतिनिधी
नाशिकच्या द्वारका परिसरात गुरुवार (दि. 30) रोजी पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या चिखल व पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात एक मालवाहू वाहन अडकले. वाहनाची मागील चाके पूर्णपणे चिखलात रुतल्याने वाहन पुढे सरकू शकले नाही. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करून वाहन बाहेर काढण्यासाठी मदत केली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे द्वारका परिसरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले. मात्र, या खोदकामानंतर खड्डे व्यवस्थित बुजविले गेले नाही. त्यामुळे पावसामुळे जमिन खचण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापूर्वी कार्बन नाका येथे एक ट्रक खचलेल्या रस्त्यात अडकून पडला होता. पंचवटीत स्कूल व्हॅनही अडकून पडली होती.

A goods-carrying tempo got stuck in a pothole in the Dwarka area.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *