उसाच्या शेतात बिबट्याने दोन महिला मजुरांवर झडप घातली.

सिन्नर : प्रतिनिधी
उसाच्या शेतात कामकाज करताना बिबट्याची चाहूलही लागली नाही आणि अचानक त्याने दोन महिला मजुरांवर झडप घातली. बिबट्याच्या या अनपेक्षित हल्ल्यात दोन ऊसतोड मजूर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 22) दुपारी वडांगळी येथे घडली. जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी हल्ल्यानंतरही बिबट्या परिसरात मुक्तपणे फिरत असल्याचे स्थानिकांनी केलेल्या चित्रीकरणातून समोर आले आहे. गेल्या वर्षी याच परिसरात नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. आता पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

या हल्ल्यात सोन्याबाई ज्ञानेश्वर राठोड (वय 25) आणि योगिता अर्जुन जाधव (30, दोघी रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव) जखमी झाल्या आहेत. सोन्याबाई यांच्या गुडघा, कंबर आणि पाठीवर बिबट्याच्या नखांनी खोलवर जखमा केल्या आहेत. योगिता यांच्या डोक्याला आणि उजव्या दंडाला बिबट्याच्या पंजाचा मार लागला आहे. वडांगळी-तामसवाडी रस्त्यालगत शांताराम सैंद यांच्या मालकीच्या गट क्रमांक 250 मधील शेतात रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. शेतात सुमारे 20 ते 25 मजूर ऊसतोडीच्या कामात व्यस्त होते. पुरुष मजूर ट्रॅक्टरमध्ये ऊस रचत होते, तर महिला मजूर शेतातील उर्वरित दहा गुंठे क्षेत्रातील ऊस तोडत होत्या. याचवेळी अचानक बिबट्याने महिलांवर हल्ला चढविला. काही क्षणांत घडलेल्या या प्रकारामुळे मजुरांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचविण्यासाठी मजुरांनी शेतातून धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनपरिक्षेत्राधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक दीपाली सदावर्ते, मधुकर शिंदे तसेच वन्यजीव रक्षक रोहित लोणारे आणि निखिल वैद्य यांनी दोन्ही जखमी महिलांना सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बिटको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.पश्चिम विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी

दोन महिलांवर हल्ला केल्यानंतरही बिबट्या परिसरातून निघून गेलेला नाही. स्थानिकांनी केलेल्या चित्रीकरणात तो याच परिसरात फिरताना दिसला आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतात जाणार्‍या मजुरांसह शेतकर्‍यांमध्ये भीती वाढली आहे. गेल्या वर्षी वडांगळी परिसरात नरभक्षक बिबट्याने घातलेले थैमान नागरिक विसरलेले नाहीत. त्यातच पुन्हा हल्ल्याची घटना घडल्याने नागरिक धास्तावले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

A leopard pounced on two female laborers while they were working in a sugarcane field.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *