चीनच्या द्राक्षांना मुंबईत 250 रुपयांवर भाव

राज्यासह जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या आशा पल्लवित

निफाड : विशेष प्रतिनिधी
मुंबईच्या वाशी बाजार समितीमध्ये चीनची द्राक्षे विक्रीस आल्याने व त्यास प्रतिकिलो 250 ते 300 असा चांगला दर मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष उत्पादकांंमध्ये नव्याने आशेचा किरण दिसू लागला आहे. चीनच्या द्राक्षांना मिळणारा उच्च दर पाहता स्थानिक द्राक्षांना यंदा अधिक दर मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पादन कमी असूनही मागणी कायम राहिल्याने बाजारभाव वाढण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहे.
यंदाच्या अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागात द्राक्षवेलींवर परिणाम झाला आहे अनेक ठिकाणी रोग, कुज, फळगळ यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षी द्राक्ष उत्पादन तब्बल 70 टक्क्यांहून अधिक कमी होण्याची शक्यता आहे.
परिणामी द्राक्षकाढणी हंगामही लांबणीवर जाणार आहे. दरम्यान, द्राक्षशेतीला मोठा धक्का बसलेल्या या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत चीनची द्राक्षे विक्रीस उपलब्ध झाल्याने बाजारात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. चीनमधून थेट आयात केलेली शाइन मस्कत ही व्हरायटी सध्या ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. ही द्राक्षे आकर्षक रंगाची, सीडलेस आणि चविष्ट असल्याने त्यांना भरघोस मागणी
आहे. शाइन मस्कत तसेच रेड ग्लोब, क्रिमसन आणि सफायर या चार व्हरायटी बाजारात दाखल झाल्या आहेत. चीनमधील द्राक्षांच्या पाच किलो पेट्यांना तब्बल 1500 ते 1600 रुपयांचा दर मिळत आहे. म्हणजेच प्रतिकिलो 250 ते 300 रुपये असा भाव मिळत आहे. स्थानिक बाजारात चीनच्या द्राक्षांना मोठी पसंती मिळत आहे. या घडामोडींमुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नव्याने आशेचा किरण दिसू लागला
आहे.
चीनच्या द्राक्षांना मिळणारा उच्च दर पाहता स्थानिक द्राक्षांना यंदा अधिक दर मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पादन कमी असूनही मागणी कायम राहिल्याने बाजारभाव वाढण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहेत.नाशिक जिल्हा, पुणे, सांगली, सोलापूर या प्रमुख द्राक्षपट्ट्यात यावर्षी नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले, तरी मुंबई बाजारात चीनच्या द्राक्षांना मिळणारा प्रतिसाद पाहता शेतकर्‍यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढू लागला आहे.
आगामी काही दिवसांत स्थानिक द्राक्षांचा पुरवठा कमी असणार असल्याने बाजारभाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.राज्य सरकारकडून नुकसानभरपाई व मदत जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत असतानाच चीनच्या द्राक्षांना मिळालेल्या दरामुळे नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची ‘दराची’ आशा पुन्हा बळावली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *