पुरुषही माणूस आहे… त्याच्या भावनांनाही समजून घ्या!

जगभरात विविध विषयांवर जनजागृती करण्यासाठी आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी अनेक विशेष दिवस साजरे केले जातात. याच दिवसांपैकी एक म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. हा दिवस केवळ पुरुषांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या मनातील न बोललेल्या भावना, आरोग्याच्या समस्या, मानसिक संघर्ष आणि सामाजिक जबाबदार्‍यांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची आठवण करून
देणारा आहे.
आपल्या समाजात पुरुषांकडून नेहमी खंबीर राहण्याची अपेक्षा केली जाते. कुटुंबाचा आधार बनणे, आर्थिक जबाबदार्‍या पार पाडणे, संकटाच्या वेळी धीर देणे आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगता उभे राहणे, अशा अनेक अपेक्षांचे ओझे त्याच्या खांद्यावर असते. लहानपणापासूनच ‘मुलांनी रडायचे नसते’, ‘पुरुषांनी कमजोर दिसता कामा नये’, असे संस्कार अनेकदा त्यांच्यावर केले जातात. त्यामुळे मनात दुःख असतानाही हसण्याचा, अडचणी असतानाही सर्व काही ठीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न अनेक पुरुष करतात. मात्र, या सगळ्या धडपडीत एक गोष्ट विसरली जाते, ती म्हणजे पुरुषही माणूस आहे. त्यालाही दुःख होते, भीती वाटते, अपयशाची चिंता सतावते, मानसिक ताण जाणवतो आणि कधी कधी त्यालाही कुणाच्या तरी आधाराची गरज असते. पुरुषांच्या भावनांना समजून घेणे, त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांना मनमोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची जागतिक संकल्पना ‘ढहश र्र्ऋीीीींश खी र्एींशीूेपश’ म्हणजेच ‘भविष्य सर्वांचे आहे’ अशी आहे. या संकल्पनेतून एक महत्त्वाचा विचार मांडण्यात आला आहे. समाजाचे भविष्य घडवण्याची जबाबदारी केवळ महिला किंवा पुरुष यांपैकी कोणाचीही एकट्याची नाही. महिला आणि पुरुष या दोघांच्या समान सहभागातूनच समताधिष्ठित, संवेदनशील आणि प्रगत समाजाची निर्मिती होऊ शकते. या संकल्पनेत पुरुष आणि मुलांचे आरोग्य, सन्मान, सकारात्मक सामाजिक भूमिका आणि सर्वांगीण कल्याण यांनाही महत्त्व देण्यात आले आहे. पुरुषांच्या प्रश्नांवर चर्चा करणे म्हणजे महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे नव्हे. उलट, परस्परांचा सन्मान, समान संधी आणि सहकार्य यांमधूनच निरोगी सामाजिक नातेसंबंध निर्माण होऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झाली. वेस्ट इंडिज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम टीलकसिंह यांनी या दिवसाची संकल्पना मांडली. त्यांनी 19 नोव्हेंबर ही तारीख आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणून निश्चित केली. सुरुवातीला पुरुषांच्या कर्तृत्वाचा गौरव आणि समाजातील त्यांच्या योगदानाची दखल घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू होता. पुढे हा दिवस जगातील विविध देशांमध्ये पोहोचला आणि पुरुषांच्या आरोग्यापासून ते सामाजिक समानतेपर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याचे व्यासपीठ बनला. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यामागे अनेक महत्त्वाचे उद्देश आहेत. समाजात सकारात्मक आदर्श निर्माण करणार्‍या पुरुषांच्या कार्याची दखल घेणे, पुरुषांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, कुटुंबाच्या आणि समाजाच्या उभारणीत त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे, तसेच स्त्री-पुरुषांमधील परस्पर विश्वास आणि समानतेची भावना दृढ करणे, हे त्यातील प्रमुख उद्देश आहेत. पुरुष आणि मुलांना भेडसावणार्‍या सामाजिक समस्यांवर मोकळेपणाने चर्चा व्हावी, हिंसा आणि भेदभावमुक्त समाज निर्माण व्हावा आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी मिळावी, हा या दिवसाचा व्यापक संदेश आहे. यानिमित्ताने विविध ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन, चर्चासत्रे आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जातात. वडील, भाऊ, पती, मुलगा, मित्र किंवा सहकारी म्हणून आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पुरुषांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.
एखादा वडील आपल्या मुलांच्या भविष्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. एखादा पती कुटुंबाच्या सुखासाठी दिवसरात्र कष्ट करतो. एखादा मुलगा वृद्ध आई-वडिलांचा आधार बनतो. एखादा भाऊ बहिणीच्या पाठीशी उभा राहतो, तर एखादा मित्र संकटाच्या काळात न बोलता मदतीचा हात पुढे करतो. या प्रत्येक भूमिकेत पुरुषाचे योगदान वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. मात्र, त्याच्या या योगदानाची दखल अनेकदा सहजपणे घेतली जात नाही. पुरुष दिनानिमित्त केवळ शुभेच्छा देऊन किंवा समाजमाध्यमांवर संदेश प्रसिद्ध करून आपली जबाबदारी संपत नाही. घरातील पुरुषांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि गरजेच्या वेळी त्यांना भावनिक आधार देणे अधिक महत्त्वाचे आहे. पुरुषांनीही आपल्या भावना दडपून न ठेवता त्या व्यक्त करायला हव्यात. मानसिक ताण जाणवत असल्यास मदत मागण्यात कोणताही कमीपणा नाही, ही जाणीव समाजात निर्माण झाली पाहिजे.
शेवटी, पुरुष दिन हा पुरुष श्रेष्ठ की महिला श्रेष्ठ, याची तुलना करण्याचा दिवस नाही. तो माणुसकी, समानता, परस्पर सन्मान आणि सहजीवनाचा विचार दृढ करण्याचा दिवस आहे. स्त्रीच्या संघर्षाला जशी संवेदना मिळायला हवी, तशीच पुरुषाच्या संघर्षालाही समजून घेण्याची गरज आहे. कारण कुटुंबाचा आधार असणार्‍या पुरुषालाही कधी आधाराची गरज असते. त्याच्या कर्तव्यांचा गौरव करताना त्याच्या भावनांनाही स्थान मिळायला हवे. पुरुषाला केवळ कर्तव्यांची जाणीव करून देण्यापेक्षा त्याच्या माणूसपणाचा सन्मान करूया. हाच आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा खरा अर्थ आणि संदेश आहे.

A man is a human being too… try to understand his emotions as well!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *