युद्धाचा महिना

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारी रोजी जोरदार हवाई हल्ले केले. क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सवोर्र्च्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. इराणचे प्रमुख नेते आणि काही अधिकारी मारले गेले. यानंतर खामेनी यांचे उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची निवड करण्यात आली. निम्मेअर्धे नेतृत्व आणि अधिकारी ठार झाल्यानंतरही इराणने माघार घेतलेली नाही. अमेरिका आणि इस्रायलला महिनाभरात इराणचा पूर्ण पाडाव करता आलेला नाही. दुसरीकडे, इराणने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवले असून, अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, इराक, कुवेत व ओमान या शेजारी देशांवर इराणने क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केले. अमेरिकी लष्करी तळांना लक्ष्य करताना इराणने जगाची इंधनवाहिनी असलेल्या हार्मुझ सामुद्रधुनीवर आपली पक्कड मजबूत केली. या सामुद्रधुनीतून जाणार्‍या जहाजांना आग लावण्याचा इशारा इराणने देऊन जागतिक तेल वाहतूक जवळपास ठप्प करून टाकली. भारत, रशिया, चीन, पाकिस्तान अशा काही मित्र देशांना इराणने सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला. अमेरिका किंवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणतीही दाद द्यायची नाही, असेच इराणने ठामपणे ठरविले असल्याचे दिसत आहे. महिनाभरात इराणचे मोठे नुकसान झाले. अमेरिका आणि इस्रायलचे झालेले नुकसान इराणच्या तुलनेत कमी आहे. इराणमध्ये सुमारे साडेतीन हजार लोकांचा मृत्यू झाला. यात एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या सुमारे 165 मुलींचा समावेश आहे. मृतांमध्ये सैनिकांचाही यमावेश आहे. आतापर्यंत सुमारे 20 हजार लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलमध्ये मृतांची संख्या शंभरच्या आत (63) असल्याचे सांगितले जात आहे, तर जखमींची संख्या साडेतीन हजारांच्या जवळपास आहे. इराणने लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यांत 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या 14 पर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. इराणने शेजारी देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले, तसेच हल्ले इस्रायलने शेजारच्या लेबनॉनमध्ये केले. त्यात सुमारे 1300 लोक मरण पावले, तर जखमींची संख्या हजारो आहे. युद्धात मृत्यू व जखमींची संख्या निश्चित करणे अवघड असते. त्यामुळे निश्चित आकडे समोर येत नाहीत. युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था मंदावली, सोन्या-चांदीचे भाव कडाडले, शेअर बाजार कोसळले, जगभरात इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला, खनिज तेलाचे, गॅस महागला, असे बरेच परिणाम झाले. भारतही त्यापासून मुक्त नाही. युद्ध कधी थांबेल, याचा अंदाज बांधता येत नाही. युद्ध छेडणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने बुचकळ्यात टाकणारी आहेत. हॉर्मुझ सामुद्रधुनीत इराणने कोंडी केल्याने ही सामुद्रधुनी खुली करण्यासाठी युद्धनौका तैनात करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची विनंतीवजा सूचना अनेक देशांनी धुडकावून लावली. त्यानंतर ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक लष्करी मोहीम सुरू करूनही सामुद्रधुनी खुली झाली नाही. यानंतर इराणच्या वीजप्रकल्पांवर हल्ले करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. दुसरीकडे, इराण वाटाघाटी करण्यास तयार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानच्या मध्यस्थीने बोलणी होणार असल्याचे सांगत ट्रम्प यांनी वीजप्रकल्पांवर हल्ले पाच दिवस स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. यानंतर त्यांनी वीजप्रकल्पांवर दहा दिवस हल्ले थांबवत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेचा विजय झाला, युद्ध गुंडाळण्याची तयारी करीत आहोत. बोलणी करण्यास इराण तयार, अशी अनेक वक्तव्ये ट्रम्प यांनी केली; परंतु इराणने सर्व वक्तव्ये फेटाळून लावली. अमेरिकेशी चर्चा नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. कोणत्याही परिस्थितीत इराण माघार घेण्यास तयार नाही, असे दिसत आहे. महिनाभर होऊनही युद्ध थांबण्याचे कोणतेही संकेत नाहीत. इराणने पाकिस्तानची मध्यस्थी नाकारली आहे. इराण व अमेरिका-इस्रायल यांच्यात मध्यस्थी करण्यास कोणता देश पुढे येईल, हा प्रश्न आहे. भारताने मध्यस्थीची अद्याप तयारी दर्शवली नाही. युद्धाच्या परिणामांची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करवून दिली आहे. ट्रम्प यांच्याशी मोदींचे फोनवरून बोलणे झाले आहे. पण मोदींनी हॉर्मुझविषयी चर्चा केली. इराणने मित्र म्हणू भारताच्या तेल व गॅसवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला आहे. महिनाभरात भारताला मिळालेला हा एक तात्पुरता दिलासा आहे. पुढे युद्धात काय होईल आणि परिणाम काय होतील, याचा अंदाज नाही. हाच विचार करन मोदींनी समस्त भाषण करताना परिस्थिती कठीण असल्याची जाणीव करून दिली. भारतात गॅसटंचाई निर्माण झाली आहे. घरगुती वापरासाठी रेशनवर रॉकेल वितरण करण्याचे सरकारचे ठरविले आहे. यावरून गॅसचा तुटवडा जाणवत असल्याचे सरकारने एकप्रकारे मान्य केले आहे. दुसरीकडे, पेट्रोल व डिझेल संपल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर कसा करता येईल, याचा विचार सरकार करत आहे. महिनाभराच्या युद्धाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. हेच युद्ध लांबले तर? ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले पुढील दहा दिवसांसाठी पुढे ढकलले आहेत. 6 एप्रिल ही नवीन अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. एका आठवड्यात ट्रम्प यांनी हे हल्ले पुढे ढकलण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी शुक्रवारी संपणारी अंतिम मुदत वाढवली होती. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, 6 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपर्यंत (अमेरिकेच्या वेळेनुसार) इराणच्या वीज प्रकल्पांवर कोणताही हल्ला केला जाणार नाही. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या वाटाघाटींना पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा खूप चांगल्या प्रकारे पुढे जात आहे आणि सध्याच्या परिस्थितीत राजनैतिक तोडगा काढण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तथापि, इराणने अद्याप ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. ट्रम्प यांना इराणचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही, ही चिंतेची बाब आहे. इराणने काही अटी समोर ठेवल्या आहेत. युद्धाची भरपाई द्यावी, युद्ध पुन्हा होणार नाही याची हमी द्यावी, तात्पुरता किंवा प्रतीकात्मक युद्धविराम मान्य नाही. अमेरिकेचे सर्व लष्करी तळ मध्यपूर्वेतून हटवणे आणि पश्चिम आशियातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करणे इत्यादी अटी इराणच्या आहेत. या अटी अमेरिका मान्य करेल, असे काही दिसत नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या मोहिमेने इराणच्या लष्करी आणि सरकारी यंत्रणेला मोठा तडाखा दिला असून, अनेक वरिष्ठ नेत्यांना ठार केले आहे. शेकडो लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. तरीही इराणकडून क्षेपणास्त्रांंचा मारा सुरूच आहे आणि सरकारविरुद्ध उठाव झाल्याचे दिसत नाही. महिनाभर इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना तोंड दिले आहे. हल्ल्यांमध्ये टिकून राहणे, हेच इराणचे ध्येय असल्याचे दिसतेे. तूर्त युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत, ही एक मोठी चिंता आहे.

A month of war

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *