10 कोटींच्या संवर्धन कामांना प्रारंभ!
सिन्नर : प्रतिनिधी
काळाच्या ओघात दगडांची होणारी झीज, निखळणारे दगड आणि धोक्यात आलेली शिल्पकला… सिन्नरच्या ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराचे हे वैभव जपण्याचे आव्हान आता पेलले जाणार आहे. बाराव्या शतकातील या प्राचीन मंदिराच्या संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात झाली आहे. मंदिराच्या मूळ स्थापत्यशैलीचे जतन करण्यासोबतच परिसराचा कायापालट आणि भाविकांसाठी सुविधांची निर्मिती केली जाणार असल्याने गोंदेश्वर मंदिराला नवे रूप मिळणार आहे.
खासदार राजाभाऊ वाजे यांनी भारतीय पुरातत्त्व
सर्वेक्षण विभागाकडे मंदिराच्या संवर्धनासाठी निधीची मागणी करत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश येत राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे कळविण्यात आले होते.
सोमवारी (दि. 23) मंदिर परिसरात विविध झाडांच्या कुंड्या लावण्याचे काम सुरू होते. सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दगडी शिल्पांना मिळणार संरक्षण
गोंदेश्वर मंदिराचे शिखर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. मंदिरावरील काही दगड निखळू लागले असून, दगडांची झीज झाल्याने त्यावरील कोरीव शिल्पांचे अस्तित्वही धोक्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता संवर्धन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्यही जपणार
गोंदेश्वर मंदिराचे प्रमुख आकर्षण असलेल्या सूर्याभिषेकाच्या किरणोत्सवाचे वैशिष्ट्य टिकवण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मंदिराच्या संरक्षित हद्दीपासून 100 मीटरचा प्रतिबंधित, तर पुढील 200 मीटरचा नियंत्रित परिसर आहे. या क्षेत्रातील बांधकामांवर कायद्यानुसार नियंत्रण ठेवून नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. गोंदेश्वर मंदिराच्या किरणोत्सवाचे अभ्यासक दत्ता शेळके यांनीही या कामाचे स्वागत केले आहे.
परिसराला मिळणार सुशोभीकरणाची जोड
मंदिर परिसरात पायवाटा, पाणीपुरवठा आणि सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य यांची माहिती देणारे सांस्कृतिक माहितीफलकही उभारण्यात येतील. संवर्धनाची कामे वेळेत पूर्ण होण्यासह त्यांचा दर्जा राखण्यावर भर दिला जाणार आहे.
A new look for the splendor of the Gondeshwar Temple