एच३एन२ या विषाणूने डोके वर काढले असतानाच भारतात कोरोनाचे रुग्णही वाढत असल्याने चिंता वाढत चालली आहे.
‘इन्फ्लुएन्झा ए’ या विषाणूचा उपप्रकार असलेल्या एच३एन२ने भारतात काही बळी घेतले आहेत. या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली जात आहे. दुसरीकडे कोरोनाच्या आणखी एका नव्या अवताराने जन्म घेतला आहे. ‘एक्सबीबी.१.१६’ हे या अवताराचे नाव आहे. त्याचे भारतात सध्या ७६ रुग्ण आहेत. सर्व प्रकारच्या कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सोमवारी एक हजार १३४ नवीन रुग्ण आढळले. आहेत. यापूर्वी १९ मार्चला १ हजार ०७१ रुग्णसंख्या नोंदवली गेली होती, तर मंगळवारी ६९९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी जारी करण्यात आलेल्या ताज्या माहितीनुसार देशात सध्या सात हजार २६ रुग्ण आहेत. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन एक उच्चस्तरीय आढावा बैठक बुधवारी घेतली. आभासी पध्दतीने घेतलेल्या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडल्या, गृहमंत्री अमित शहा, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून ही आढावा बैठक घेण्यात आली. दोन तास चाललेल्या बैठकीत एकूण परिस्थितीचा व्यापक आढावा घेण्यात आल्याची माहिती आहे. पंतप्रधानांनी बोलाविलेल्या बैठकीपूर्वी मनसुख मांडविया यांनी वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक घेतली. नवीन प्रकारामुळे आव्हान वाढले असल्याचे त्यांनी मान्य करुन नियमावलीचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला. भारतात आतापर्यंत ९० टक्के लोकांना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. सुमारे २२० कोटी डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. सुमारे २५ कोटी लोकांना खबरदारीचा तिसरा डोसही देण्यात आला आहे. एवढी व्यापक मोहीम राबवूनही कोरोनाचा धोका कायम आहे. चीनमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून, तेथील परिस्थितीची खरी माहिती समोर येत नाही. मात्र, भारताला सावधगिरी घेणे भाग पडत आहे. दिल्ली, केरळ, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात छत्तिसगढ अशा काही राज्यांतही आढावा बैठका घेणे क्रमप्राप्त ठरत आहेत.
सरकार सावध
पंतप्रधानांनी आढावा बैठकीत चाचणी, रुग्णशोध, उपचार, लसीकरण आणि कोविड नियमावलीचे पालन यावर भर दिला आहे. यामध्ये सरकारी यंत्रणा काम करणार असली, तरी सामाजिक अंतर, हात स्वच्छ धुणे (सॅनिटायझरचा वापर) आणि मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा वापर पुन्हा करण्याचे आदेश जारी केले जाण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती पाहता याच त्रिसूत्रीची गरज आहे. परंतु, अत्यंत कडक नियम केले, तर त्यांचे पालन करण्यासाठी किंवा अंमलबजावणीसाठी सरकारी यंत्रणा पुन्हा कार्यरत होणार आहे. विदेशातून येणाऱ्या लोकांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याने विमानतळांवर परदेशी प्रवाशांची तपासणी करण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय लोकांची रोग प्रतिकारकशक्ती चांगली आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले असले, तरी त्रिसूत्री अंगिकारण्याची गरजही स्पष्ट केली. याशिवाय लसीचा तिसरा डोस देण्याची आवश्यकताही बळावत चालली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सर्व राज्यांना पत्र लिहून सावध केले आहे. त्यानुसार काही राज्यांनी आढावा बैठका बोलावल्या आहेत. चीनमधील परिस्थितीचा आणि वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन खबरदारी घेण्यात येत असली, तरी अगदी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांनी सांगितले. लसीकरण आणि वाढत्या कोरोना प्रकरणांचा ट्रॅक रेकॉर्ड यामुळे भारतीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही. लोकांनी सरकारच्या सूचनांचे पालन केले पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सिरमची कोवॅक्स ही नवीन लस तिसर्या डोस म्हणून वापरता यावी, यासाठी मंजुरी मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. कोरोनाचा अनुभव लक्षात घेता, परिस्थिती हाताळणे तसे काही अवघड नाही. परंतु, लोकांनी सावध राहवे, हाच सरकार आणि आरोग्य संघटनांचा प्रयत्न आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पुन्हा एकदा पालन करावे लागणार आहे, असे एकंदरीत दिसून येत आहे. आपले हात नियमितपणे पाण्याने आणि साबणाने धुणे, कोणतीही लक्षणे आढळल्यास मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका, या सामान्य सूचना आहेत. त्यांचे पालन करणे अवघड नाही.
एच३एन२ची भर
एक्सबीबी.१.१६ या प्रकाराने भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सक्रिय रूग्णांची संख्याही वाढत आहे. हा नवीन प्रकार ओमिक्रॉनपासून उद्भवला आहे. हा प्रकार अत्यंत वेगाने पसरतो आणि तो प्रतिकारशक्तीवरही काही प्रमाणात आघात करू शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचमुळे चौथी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १२ देशांमध्ये आढळला आहे. भारत, अमेरिका, ब्रुनेई, सिंगापूर, चीन आणि ब्रिटन यांचा यात समावेश आहे. यापैकी भारतात त्याचे सर्वाधिक रूग्ण आहेत. हा प्रकार आला असतानाच एच३एन२चे रुग्ण भारतात आढळत आहेत. महाराष्ट्रातही त्याने शिरकाव केला आहे. नगरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या बातमीने संपूर्ण राज्यासह देशाची चिंता वाढली. भारतात आतापर्यंत या विषाणूने बळी घेतले आहेत. त्यामुळे चिंता वाढली असून, प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेला विशेष खबरदारी घेणे अपरिहार्य आहे. एच३एन२ची लागण आणि संबंधित लक्षणांमुळे रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, श्वासोच्छ्वास त्रास आणि घरघर, दमा अशी लक्षणे आढळून आली असून, न्यूमोनियाची लक्षणे दिसून येत आहेत. काही प्रकरणांमध्ये खोकला, मळमळ, उलट्या, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि जुलाब इत्यादी लक्षणे दिसत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. एच३एन२ ची लागण झालेल्या रुग्णांना प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देण्याची गरज नाही, तर डॉक्टरांनी केवळ लक्षणानुसार उपचार करावेत, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे. लक्षणे आढळल्यास मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, आपल्या नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका, या सामान्य सूचना आहेत. काळजी घेतली, तर ही साथ आटोक्यात आणण्यासाठी मदतच होणार आहे.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…