गौरी-गणपतीसाठी नैवेद्याचे ताट त्याला पैठणीचा थाट

परदेशी भारतीयांना खण, पैठणीच्या सजावट साहित्याची मोहिनी

नाशिक ः प्रतिनिधी
गौरी-गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गौरी-गणपती घरात ज्या ठिकाणी स्थापना होणार, त्या ठिकाणी पारंपरिक खण, पैठणीची सजावट करण्याकडे महिलावर्गाची विशेष पसंती मिळत आहे. यंदा यासाठी पैठणीच्या ताटात नैवेद्याचा थाट असेल.
पारंपरिक सणांना राज्यासह परदेशी भारतीयांनादेखील पैठणी, खणापासून बनविलेल्या सजावटीच्या वस्तूंची मोहिनी पडली आहे. दोन महिने आधीपासूनच खरेदी करण्यात आली आहे.
यंदा गौरी-गणपती सणानिमित्ताने स्क्रीन प्रिंंटिंग श्लोक खण बॅकड्रॉपला पसंती मिळते आहे. गणपती स्वस्तिक खण आसन, पैठणी बॅकड्रॉप, लोड, चौरंग कव्हर, तोरण, स्क्रीन प्रिंंटिंग खण रांगोळी, खण गणपती फेटा, शेला सेट, औक्षण थाळी, विड्याचे पान-सुपारी, शुभलाभ लटकन सेट, पैठणी ओटी कोन, पैठणी खणाचे गौराईसोबत येणार्‍या बाळाचे ड्रेसेस, वॉल हँगिंग, समई स्टॅण्ड, लटकन आदी उपलब्ध आहे. कला द डिझायनच्या संचालिका वृषाली माहेगावकर यांनी खास सणासाठी पारंपरिक वस्तूंना मागणी असल्याचे सांगितले.
सणानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होत असून, गरजू महिलांनाही रोजगार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पैठणी किंवा खणाच्या कापडापासून नैवेद्याचे, पूजेचे ताट यंदा प्रथमच तयार केले आहे. त्यास महिलांची पसंती मिळत आहे. प्लास्टिक किंवा इतर वस्तूंच्या सजावटीचे टिकाऊ मूल्य कमी असते. त्या तुलनेत कापडापासून तयार केलेल्या सजावटीच्या वस्तू धुऊन पुनः पुन्हा वापरता येत असल्याने महिलावर्गाची एकदा सजावटीच्या पारंपरिक वस्तूंसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरत असल्याचे महिलांनी सांगितले.

खणाबरोबर पैठणीमध्येही गणपतीसाठी तोरण, चौरंग कव्हर, लोड, आसन, गणपती फेटा, शेला, गणपतीमागील पडदा, औक्षण थाळी, गणपतीबरोबर येणार्‍या गौरीच्या बाळाचे पैठणी ड्रेस, खण रांगोळी बनवले आहेत. पैठणीला वेगळी अशी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न म्हणजे त्यात बनवलेले हे प्रॉडक्ट्स. एकाच रंगात एकाच फॅब्रिकमध्ये बनवल्या जाणार्‍या वस्तूंमुळे पैठणी कॉम्बो, खण कॉम्बो सेट घेण्याकडे लोकांचा कल जास्त आहे.

असे आहेत दर
♦ स्क्रीन प्रिंंटिंग श्लोक खण बॅकड्रॉप ः 1,100 रुपये ♦ छोटी साइज स्क्रीन प्रिंंटिंग श्लोक खण बॅकड्रॉप ः 900 रुपये ♦ गणपती स्वस्तिक खण आसन ः 140 रुपये  ♦ पैठणी बॅकड्रॉप ः 1,200 रुपये  ♦ पैठणी लोड सेट ः 350 रुपये ♦ पैठणी चौरंग कव्हर ः 400 ते 550 रुपये  ♦ पैठणी तोरण ः 400 रुपये  ♦ स्क्रीन प्रिंंटिंग श्लोक खण रांगोळी ः 150 रुपये ♦ खण गणपती फेटा, शेला सेट ः 450 रुपये ♦ पैठणी गणपती औक्षण थाळी ः 450 रुपये ♦ विड्याचे पानसुपारी ः 100 रुपये ♦ खणाचे शुभलाभ लटकन सेट ः 450 रुपये ♦ पैठणी ओटी कोन ः 40 रुपये पीस ♦ पैठणीचे बाळाचे ड्रेसेस ः 400 रुपये.

गणपतीचे आगमन लवकर होत असल्यामुळे मे, जूनपासूनच ऑर्डर सुरू झाल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, गोवा, अहिल्यानगर, हैदराबाद या शहरांत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जुलैमध्ये प्रदर्शनासाठी मॉरिशसला जाण्याची संधी मिळाली. गणपती स्पेशल असल्यामुळे तेथील लोकांनाही सगळे प्रॉडक्ट आवडले. पारंपरिक वस्तूंना परदेशातही चांगली मागणी आहे. भारतातच नाही, तर परदेशातही आपली संस्कृती जपली जाते, याचा आनंद वाटतो.
– वृषाली माहेगावकर, संचालिका, कला द डिझायनर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *