305 कोटींच्या जलवाहिन्यांचा शहरात विस्तार

कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटणार

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांचे काम करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून त्याद़ृष्टीने नियोजन सुरू होते. दरम्यान, शहरात एकूण 305 कोटींच्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून सहाही विभागांत जलवाहिन्यांची कामे विभागून केली जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. नव्याने जलवाहिनी टाकल्याने शहरातील कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.
नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. 22 मधील खर्जुल चौकापासून ते सिन्नर फाटा परिसरातील बस डेपोपर्यंतच्या नाल्यापर्यंत पाइपलाइन टाकली जाणार आहे. याकरिता पाणीपुरवठा विभागाकडून निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु, कोणीही मक्तेदाराने या कामात प्रतिसाद न दाखवल्याने पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली आहे. एकूण 2 कोटी 95 लाख 33 हजार खर्चून पाण्याची पाइपलाइन टाकली जाणार आहे. शहरातील विविध विभागांतील पाण्याच्या लाइन नादुरुस्त झाल्याने नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यानुसार नाशिकरोड, सातपूर, पंचवटी विभागातील विविध प्रभागांत पाण्याच्या लाइन टाकल्या जाणार आहेत. नाशिकरोड विभागाप्रमाणेच सातपूर विभागातील प्रभाग क्र. 8 मध्ये नवीन जलकुंभावरील वितरण क्षेत्रातील पाणीपुरवठाकरिता व नव्याने विकसित होणार्‍या कॉलनी परिसरात जलतरण वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या वाहिन्यांसाठी 2 कोटी 49 लाख 92 हजार 368 एवढा खर्च केला जाणार आहे. या कामासाठी सात मक्तेदारांनी पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज केले असता, त्यापैकी निविदा समितीने निविदा उघडली असता, 16.39 टक्के दराने संजय सूर्यवंशी यांची निविदा आली आहे. सोबत नवीन नाशिकमधील प्रभाग क्र. 31 मधील जायभावेनगर येथे शंभर, दीडशे, दोनशे, तीनशे मि.मी. व्यासाची पाइपलाइन टाकली जाणार आहे. त्यासाठी 94 लाख 57 हजारांची निविदा काढण्यात आली. हे काम श्याम कुलकर्णी निविदाधारकाने अठरा टक्के कमी खर्चाने भरल्याने हे काम त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान, शहरातील सहाही विभागांत जलवाहिन्यांची कामे केली जाणार आहेत.

शहरात पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी जलवाहिन्यांची कामे करण्यात आली आहेत. या जलवाहिन्या जीर्ण झाल्याने 305 कोटी खर्चून नव्याने जलवाहिन्यांचा विस्तार केला जाणार आहे.
-रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा, मनपा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *