आस्वाद

शेवटच्या भेटीत भांडण, पुढच्या भेटीत खांदा…!

– अफजल पठाण
एकाच आईच्या कुशीत वाढलो, एकाच अंगणात खेळलो, रुसलो, भांडलो… तरी एकमेकांशिवाय कधी राहिलो नाही. आज घरं तीच, माणसं तीच… पण मनं मात्र दूर गेली, जमिनीचे वाटे झाले… आणि नकळत नात्यांचेही झाले.
लहानपणी घरात दोन भाऊ असोत, भाऊ-बहीण असोत किंवा अनेक भावंडं असोत, भांडणं ही रोजचीच गोष्ट असायची. कधी शेवटच्या लाडूवरून, कधी खेळण्यावरून, कधी आईच्या मांडीवर कोण बसणार यावरून, तर कधी नवीन कपड्यांवरून. एकमेकांचे खेळणे हिसकावून घेणे, चिडवणे, रुसवे-फुगवे, थोडी मारामारी, हे सगळं इतकं स्वाभाविक होतं की, त्याशिवाय बालपण अपूर्णच वाटायचं. पण त्या भांडणात द्वेष नव्हता, रागात अहंकार नव्हता आणि अश्रूमध्ये कायमचा दुरावा नव्हता.
मोठा भाऊ धाकट्याला रागवायचा, पण बाहेरचा कोणी त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर सर्वप्रथम तोच त्याच्या संरक्षणासाठी उभा राहायचा. बहीण भावाला दिवसभर चिडवायची, पण त्याला ताप आला की रात्रभर त्याच्या उशाशी बसायची. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तिच्या डोळ्यातला विश्वास आणि भावाच्या डोळ्यातलं संरक्षणाचं वचन हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असायचं. मग आयुष्य पुढे सरकलं, शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, जबाबदार्‍या आणि या सगळ्यांच्या गर्दीत नकळत नाती मागे पडू लागली.
आज अनेक घरांत दोन भाऊ एकाच वडिलांच्या संपत्तीसाठी कोर्टात एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. एकाच आईच्या लेकरांनी एकमेकांची बदनामी सुरू केली आहे. वर्षानुवर्षे एकमेकांचं तोंड पाहिलेलं नाही. बहिणीच्या घरी जाणं बंद झालं, भावाच्या घरचा उंबरठा परका झाला. कधी स्वतःलाच विचारून पाहा, ज्या जमिनीसाठी आपण भांडतो, ती जमीन आपल्या शेवटच्या प्रवासात सोबत येणार आहे का? ज्या पैशासाठी आपण भावाला किंवा बहिणीला गमावतो, तो पैसा आई-वडिलांच्या एका अश्रूपेक्षा मोठा आहे का? कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो, पण आई-वडिलांच्या मनात पडलेली जखम कोण भरून काढणार?
अनेकदा शेवटची भेट ही रागातच होते. पुन्हा बोलू… असं म्हणत आपण निघून जातो, पण नियतीला ते मान्य नसतं. मग एक दिवस अचानक फोन येतो,
लवकर या… तुमचा भाऊ आता बोलणार नाही, रुग्णालयाच्या त्या थंडगार खोलीत किंवा घराच्या अंगणात पांढर्‍या चादरीखाली शांत झोपलेला भाऊ दिसतो, तेव्हा आठवतं, शेवटच्या भेटीत आपण त्याच्याशी हसूनही बोललो नव्हतो. ज्याच्याशी जमिनीसाठी भांडलो, त्याच्याच अर्थीला खांदा देताना हात थरथरतात आणि मन फक्त एकच प्रश्न विचारत राहतं हे भांडण खरंच इतकं मोठं होतं का?
तेव्हा लाखो रुपयांची जमीनही निरर्थक वाटते, कारण त्या एका मिठीची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी मोठी असते. एक दिवस आई-वडील या जगातून निघून जातात. जुनं घर ओस पडतं.
कपाटातला एक जुना फोटो हातात येतो. त्या फोटोत दोन भाऊ एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून हसत असतात, मध्ये बहीण उभी असते आणि त्या एका क्षणी डोळ्यातून वाहणारे अश्रू सांगून जातात की, आपण जिंकलेली जमीन खूप छोटी होती, पण हरवलेलं नातं खूप मोठं होतं. अजूनही वेळ गेलेली नाही, तुमचा भाऊ रुसला असेल, तर त्याच्या दारावर जा. तुमची बहीण दुरावली असेल, तर तिच्या घरी जा. पहिला फोन तुम्ही करा. पहिली मिठी तुम्ही मारा. माफ कर हे दोन शब्द उच्चारायला अहंकार आड येऊ देऊ नका, कारण… जमिनीचे वाटे करता येतात, पण आईच्या मायेचे वाटे करता येत नाहीत.
संपत्तीची विभागणी करता येते, पण बालपणाच्या आठवणींची विभागणी करता येत नाही. आणि लक्षात ठेवा, अंत्ययात्रेत खांदा देण्यापेक्षा, जिवंतपणी खांद्यावर हात ठेवणं जास्त मौल्यवान असतं. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची खरी संपत्ती म्हणजे बँकेतले पैसे नसतात तर एकमेकांचा हात न सोडणारी त्यांची भावंडं असतात.
आजच एक फोन करा…
आजच एक मिठी मारा…
कारण उद्या कदाचित वेळ असेल…
पण माणूस नसेल.

A quarrel at the last meeting, a shoulder to lean on at the next…!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

2 days ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

2 days ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 days ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 days ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 days ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 days ago