राज ठाकरे : मूळ प्रश्नांंवरून लक्ष विचलित होत असल्याची टीका
मुंबई : प्रतिनिधी
सध्या देशभरात जाणीवपूर्वक धर्माची ’झिंग’ निर्माण केली जात असून, नागरिकांनी धर्माभिमानी जरूर असावे; परंतु धर्मांध होऊ नये, असा स्पष्ट संदेश मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
या मेळाव्यात एका कथित प्रवचनकाराच्या अतार्किक कथांची यथेच्छ खिल्ली उडवली. रामायणातील युद्धादरम्यान रावणाचे एक लाख पुत्र आणि दीड लाख नातू मारले गेल्याच्या दाव्यावर भाष्य करताना, रावणाला दहा तोंडे होती तर एवढी मुले कधी झाली आणि त्याला जेवायला तरी वेळ मिळाला होता का, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
यासोबतच युद्धातील अस्त्रे ज्या ’अस्त्रालयात’ लपवून ठेवली तेच ठिकाण आजचे ’ऑस्ट्रेलिया’ असल्याच्या दाव्याचाही त्यांनी समाचार घेतला. अशा तर्कहीन कथा जनता डोळे झाकून आणि भाबडेपणाने ऐकत असल्याबद्दल त्यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले.
या निरर्थक कथांच्या माध्यमातून जनतेला देशातील खर्या आणि गंभीर प्रश्नांपासून जाणीवपूर्वक दूर नेण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
बेरोजगारी अन् समस्यांकडे दुर्लक्ष
सोशल मीडियाच्या माध्यमातून हेतुपुरस्सर राग आणि विचलित करणारे मुद्दे पसरवले जात आहेत, जेणेकरून बेरोजगारी व इतर मूळ समस्यांकडे लोकांचे दुर्लक्ष होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच शासकीय कार्यालये आणि शाळांमध्ये कोणाचे फोटो असावेत याविषयीचे नियमही काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत, असे सांगत त्यांनी जनतेने वास्तवाचे भान राखण्याचे आवाहन केले.
A religious frenzy is being deliberately whipped up in the country.