भविष्यात भारतासाठी अन्न पिकवणार कोण?

कृषी क्षेत्रापुढील नवे आणि गंभीर संकट

नवी दिल्ली : प्रतिनिधी
भारत हा जगातील सर्वांत तरुण देशांपैकी एक आहे, जिथे लोकसंख्येचे सरासरी वय अवघे 29 वर्षे आहे. मात्र, याच तरुण देशाचे पोषण करणारा बळीराजा आता वयोवृद्ध होत चालला आहे. विविध अभ्यासांनुसार, भारतातील शेतकर्‍यांचे सरासरी वय 50 ते 55 वर्षांच्या घरात पोहोचले आहे. अन्नसुरक्षेवर चर्चा करताना आपण अनेकदा मान्सून, बियाणे, खते आणि अन्नधान्याच्या साठ्यावर लक्ष केंद्रित करतो. पण, ’भविष्यात आपल्या ताटातील अन्न पिकवणार कोण?’ या सर्वाधिक महत्त्वाच्या प्रश्नाकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. एका तरुण देशाचे अन्न उत्पादन वाढत्या वयाच्या मजुरांवर आणि शेतकर्‍यांवर अवलंबून असणे, हा एक मोठा आणि धोकादायक विरोधाभास आहे.
पिढ्यान् पिढ्या चालत आलेला शेतीचा वारसा आता खंडित होण्याच्या मार्गावर आहे. ’डाउन टू अर्थ’ने नमूद केलेल्या एका अहवालानुसार, ग्रामीण भागातील केवळ 1.2 टक्के तरुणांनाच शेतीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. हवामानातील लहरीपणा, बाजारभावातील अस्थिरता, वाढता उत्पादन खर्च आणि जमिनीचे तुकडीकरण यामुळे शेती हा आता एक शाश्वत व्यवसाय न वाटता जुगार वाटू लागला आहे. अशा परिस्थितीत, करिअरच्या उंबरठ्यावर उभा असलेला ग्रामीण तरुण साहजिकच शहरांमधील निश्चित वेतनाच्या नोकर्‍यांकडे आणि बिगर-कृषी क्षेत्राकडे आशेने पाहत आहे. तरुणांचे हे स्थलांतर केवळ एक सामाजिक समस्या नसून, तो एक अत्यंत व्यावहारिक आर्थिक निर्णय आहे.
जमिनीचा लहान आकार अडसर
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ)
सर्वेक्षणानुसार, देशातील तब्बल 70.4 टक्के शेतकरी कुटुंबांकडे एक हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. जमिनीचा आकार इतका लहान असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणेआणि अनपेक्षित नैसर्गिक संकटांना तोंड देणे अशक्य होऊन बसते. 2012-13 मध्ये शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न 6,426 रुपये होते, जे 2018-19 मध्ये 10,218 रुपयांपर्यंत वाढले. ही वाढ असली तरी, वेगाने वाढणार्‍या बिगर-कृषी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ती अत्यंत तुटपुंजी आहे. एका अभ्यासानुसार, 67.43 टक्के तरुणांनी असंघटित बाजारपेठ आणि शेतीमालाला मिळणारा अयोग्य भाव हे शेती सोडण्यामागचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.
शेतकरी वयोवृद्ध होण्यातील खरी अडचण केवळ श्रमाची नाही, तर ज्ञानाच्या हस्तांतरणाची आहे. आजच्या वयोवृद्ध शेतकर्‍यांकडे माती, हवामान, पिके आणि स्थानिक कृषी व्यवस्थेचे दशकांचे सखोल ज्ञान आहे. पण हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि त्यात आधुनिकतेची भर घालण्यासाठी नवी पिढीच शेतात नसेल, तर हे ज्ञान लुप्त होईल. भविष्यात शेतमजुरांची तीव्र टंचाई निर्माण होईल, ज्यामुळे फलोत्पादन आणि पशुपालनासारख्या क्षेत्रांना मोठा फटका बसेल. अनेक छोट्या जमिनी पडीक राहतील किंवा केवळ मशिन्सवर अवलंबून राहावे लागेल. याचा थेट परिणाम देशाच्या अन्नसुरक्षेवर, अन्नाच्या उपलब्धतेवर आणि वाढत्या किमतींवर होईल.

Who will grow food for India in the future?

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *