उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आक्रमक आणि जहाल हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे तेच राज्यात नेते आहेत. समाजवादी पक्ष, काँग्रेस व इतर पक्षांची इंडिया आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असली, तरी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपाला शह म्हणून पीडीए म्हणजे पिछडा, दलित, अल्पसंख्याक यांची मोट बांधली आहे. मागासवर्गीय (पिछडा) म्हणजे ओबीसींचे नेते म्हणून अखिलेश यादव ओळखले जातात. अल्पसंख्याकांचे म्हणजे मुस्लिमांचे संरक्षक म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी राज्यातील एक मोठा घटक म्हणजे दलितांना आपलेसे करण्याचाही प्रयत्न केला आहे. ओबीसी, दलित आणि मुस्लिम या तीन घटकांची मोट बांधूनही अखिलेश यादव यांना हिंदूंचे महत्त्व समजले आहे. हिंदू मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्यांनी सौम्य हिंदुत्वाचा मार्ग चोखाळला आहे. धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस व समाजवादी पक्ष यांचा भर असला, तरी हिंदुत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेच त्यांच्या लक्षात आले आहे. अखिलेश यादव यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे ठरवले आहे. यामागे आगामी निवडणुका हेच कारण आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने सोशल इंजिनिअरिंगच्या नावाने 2007 साली दलित व अल्पसंख्याकांना एकत्रित
करताना ब्राह्मण, बनिया, ठाकूर यांनाही आपलेसे केले होते. त्यांच्या पक्षाचे चिन्ह हत्ती आहे. त्यांनी त्यावेळी ‘हाथी नहीं गणेश है’ अशी घोषणा देऊन हिंदूंना आपल्या पक्षाच्या छत्राखाली आणले होते. श्रीराम हे सर्वांचे आहेत, हेच दाखवून देण्यासाठी अखिलेश यादव दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत. त्यांचा राम मंदिरातील दर्शन सोहळा परिवर्तनाची नांदी ठरेल. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचे पतन ज्या पक्षाने मान्य केले नाही, त्या पक्षाचे मुखिया भगव्या वाटेने निघाले आहेत. हिंदुत्वाचा प्रभाव म्हणावा लागेल. भाजपाच्या घोडदौडीला रोखण्यासाठी विरोधकांना हिंदुत्वाच्या प्रतीकांचा आधार घ्यावा लागला किंवा लागत आहे. सन 2007 मध्ये मायावतींनी तेच केले. राहुल गांधींनी 2017 साली गुजरातमधील व 2018 साली कर्नाटकातील हिंदू मंदिरांना भेटी दिल्या होत्या. अखिलेश यादव यांनी जानेवारी 2021 मध्ये चित्रकूट दौर्यादरम्यान प्रमुख मंदिरांत जाऊन दर्शन घेतले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये वाराणसी दौर्यात त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात विधिवत पूजाअर्चा केली होती. समाजवादी पक्षाने जाहीर केल्यानुसार, अखिलेश यादव 12 डिसेंबर 2026 रोजी अयोध्येतील हनुमानगढी आणि राम मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच मथुरा-वृंदावन येथील मंदिरांनाही भेट देणार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी 25 सप्टेंबर 2017 रोजी द्वारकाधीश मंदिरापासून प्रचार सुरू केला होता. 12 डिसेंबर
2017 रोजी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरापर्यंत त्यांनी सोमनाथ, अक्षरधाम (नोव्हेंबर 2017) आणि अंबाजीसह 26 हून अधिक मंदिरांना भेटी दिल्या होत्या. फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांनी पुन्हा द्वारकाधीश मंदिरात जाऊन पूजा केली होती. तथापि, त्यांच्या पक्षाला यश मिळाले नाही. कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 13 फेब्रुवारी 2018 रोजी बसवकल्याण येथील अनुभव मंटपाला भेट दिली होती. त्यानंतर मार्च 2018 मध्ये शृंगेरी शारदांबा मंदिर व गोकर्णनाथेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते. शेवटच्या टप्प्यात 9 मे 2018 रोजी बेंगळुरूतील दोड्डा गणपती मंदिरात दर्शन घेतले. 23 एप्रिल 2023 रोजी बसव जयंतीनिमित्त बागलकोट जिल्ह्यातील कुडलसंगम येथील संगमनाथ मंदिराला भेट दिली होती. त्यांच्या पक्षाला कर्नाटकात यशही मिळाले. अखिलेश यादव यांच्या अलीकडच्या भूमिकांकडे पाहता, भगवी वाट सत्तेकडे जाणारी आहे, असे त्यांना वाटत आहे. इटावा येथे केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालू यादव वैचारिकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष भूमिकेत असले, तरी कौटुंबिक आणि खासगी समारंभांत हिंदू परंपरांचे पालन आणि प्रसार ते करतात. तामिळनाडूचे मुख्यमंत्री नेते सी. जोसेफ विजय धर्मनिरपेक्ष असले तरी मंदिरांना भेटी देतात. ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स) आणि मेहबूबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक) मंदिरात जाताना दिसतात. राहुल गांधी यांनीही अयोध्येला जावे, असे त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना वाटत
असेलही. सोनिया गांधी यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चर्चेत असताना ते राम मंदिरात गेले, तर भाजपाकडून राजकारण केले जाण्याची शक्यता आहे. भाजपाला विरोध करणारे नेते मंदिरांत गेले, तर या नेत्यांनी आपली तत्त्वे सोडली, असे म्हणता येणार नाही. राजकीय अपरिहार्यता म्हणून वेळप्रसंगी भूमिका बदलाव्या लागतात. बरेच धर्मनिरपेक्ष नेते हिंदूच आहेत. हिंदू म्हणून ते मंदिरात जात असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंदिरांत जाऊन ते लक्ष वेधून घेतात. आपण किंवा आपला पक्ष हिंदूविरोधी नाही, हे दाखवून देण्याचा अखिलेश यादव यांचा प्रयत्न आहे. त्यांच्यावर भाजपाकडून आक्रमक टीका होण्याची शक्यता आहेच. अखिलेश यादव यांचे पिताश्री मुलायमसिंह यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी जमलेल्या कारसेवकांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. हाच मुद्दा अधूनमधून भाजपाकडून चर्चेत आणला जातो. हेच लक्षात घेऊन अखिलेश यादव अयोध्येत दर्शन घेण्यासाठी निघाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी 1990 मध्ये मुलायमसिंह यादव यांच्या सरकारच्या काळात कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराचा संदर्भ देत, अखिलेश यादव यांनी आधी रामभक्तांची आणि संतांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष पंकज चौधरी यांनी या भेटीला ‘निवडणुकीच्या तोंडावरील नाटक’, असे म्हटले आहे. यावर अखिलेश यादव यांनी उत्तर दिले. “देव सर्वांचा आहे आणि श्रद्धेचा विषय राजकीय चष्म्यातून पाहिला जाऊ नये”, असे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी मंदिर देणग्यांमधील कथित अनियमिततेवरून (चंदा चोरी) भाजपावर उलट टीका केली. निवडणुकीत हाच मुद्दा तापणार, असे स्पष्ट संकेत आहेत.
A Secular Saffron Path