आजकाल प्रत्येक घरात संध्याकाळी एक दृश्य अगदी सर्रास पाहायला मिळतं-कामानिमित्त बाहेर गेलेली माणसं घरी परततात, एकत्र कुटुंब बसतं, पण कोणीही एकमेकांशी बोलत नाही. दिवाणखान्यात शांतता असते आणि त्या शांततेत फक्त ऐकू येतो तो मोबाईलच्या वेगवेगळ्या नोटिफिकेशन्सचा आवाज किंवा रील्सचा पार्श्वसंगीत. प्रत्येकाचे डोळे आपापल्या स्क्रीनवर खिळलेले असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या आभासी जगात इतके गुंग झाले आहेत की, एकाच छताखाली, एकाच रक्ताची माणसं राहूनही मनानं एकमेकांपासून मैलोन्-मैल दुरावत चालली आहेत. संवाद हरवलेल्या या घरांना आता फक्त ’चार भिंतींचा निवारा’ म्हणता येईल, ’कुटुंब’ नाही. यातही विशेषतः मुलांच्या हातात लहान वयातच आलेला मोबाईल ही आजच्या पालकसृष्टीपुढील सर्वांत मोठी आणि गंभीर चिंतेची बाब बनली आहे. कुठेही कामानिमित्ताने, लग्नकार्यासाठी किंवा प्रवासाला जाताना लहान मुलं सोबत न्यावी लागणार असतील, तर आजच्या पालकांना पहिली चिंता असते ती म्हणजे-यांना सांभाळायचं कसं? पूर्वी मुलं अशा ठिकाणी गेल्यावर चार मुलांमध्ये मिसळायची, खेळायची, नवीन जागा पाहायची. पण आज चित्र बदललं आहे. मूल शांत बसून राहावं, त्याने कुठलाही त्रास देऊ नये आणि पालकांना आपल्या गप्पांमध्ये किंवा कामात अडथळा येऊ नये, यासाठी सर्रास मुलाच्या हाती मोबाईल फोन देऊन त्यांना एका कोपर्यात गुंतवून ठेवलं जातं.
त्या छोट्याशा स्क्रीनवर त्या कोवळ्या जीवाच्या नजरेसमोर काय काय येतंय, याचा विचार करायला पालकांना वेळच नसतो. सतत बदलणारे रंगीबेरंगी व्हिडिओ, उद्दिपित करणारे आवाज आणि अतिशय वेगाने बदलणारी स्क्रीन मुलांच्या मेंदूवर नकळत आघात करत असते. तिथे वापरली जाणारी भाषा, दाखवले जाणारे हावभाव आणि हिंसक किंवा अयोग्य गोष्टी मुलं अगदी लहान वयातच आत्मसात करू लागतात. ज्या वयात त्यांनी निसर्ग पाहायचा असतो, माणसांचे चेहरे वाचायचे असतात, त्या वयात ते निर्जीव काचेच्या स्क्रीनमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतात.
आपण अनेकदा समाजात किंवा मित्रमंडळींत तक्रार करतो, माझं मूल अजिबात मोबाइल सोडत नाही हो! दिवसभर गेम खेळत असतं, जेवायला मागितलं तरी चिडचिड करतं. पण शांत डोक्याने विचार करा, या चिमुकल्या हातांमध्ये हा मोबाइल पहिल्यांदा दिला कोणी? मूल अगदी लहान असताना त्याला दोन घास जास्त भरवण्यासाठी, ते रडू नये म्हणून किंवा आपल्याला घरातलं काम शांततेत करता यावं म्हणून आपणच गाणी आणि कार्टून्स लावून त्यांच्या हातात मोबाइल टेकवला होता ना? रडणार्या मुलाला शांत करण्यासाठी आईच्या कुशीची किंवा बाबांच्या खांद्याची जागा जेव्हा मोबाइलने घेतली, तेव्हाच या समस्येचं बीज रोवलं गेलं. आज जी आपली तात्पुरती ’सोय’ होती, तीच आता मुलांसाठी एक जीवघेणी ’वाईट सवय’ बनली आहे. मुले आपण कसे वागतो, यातून जास्त शिकतात. आपण दिवसातून शंभर वेळा मुलांना मोबाइल बाजूला ठेव, अभ्यासाला बस म्हणून ओरडलो, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण, काम संपवून घरात आल्यावर आपण स्वतः किती वेळ मोबाइलपासून दूर राहतो? हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला अत्यंत प्रामाणिकपणे विचारण्याची गरज आहे. लहान वयात जास्त वेळ मोबाइल पाहिल्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
मैदानी खेळ बंद झाल्यामुळे बालपणातील लठ्ठपणा वाढतो आहे. दृष्टी कमजोर होणे, एकाग्रता भंग पावणे, चिडचिडेपणा वाढणे आणि रात्रीची झोप न येणे अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. सर्वांत मोठा धोका म्हणजे ’सोशल आयसोलेशन’ (सामाजिक अलिप्तता). ही मुलं आभासी जगात हजारो मित्रांशी जोडलेली असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यात शेजार्याशी किंवा नातलगाशी दोन मिनिटं नीट बोलू शकत नाहीत. त्यांच्यातील संवादाची कौशल्ये आणि भावनांची देवाणघेवाण करण्याची क्षमता संपत चालली आहे.
उपाय काय करू शकतो–
1. घरात काही भाग आणि वेळ ’मोबाइलमुक्त’ ठेवा. 2. मुलांचा मोबाइल सोडवायचा असेल, तर त्यांना त्यापेक्षा अधिक रंजक काहीतरी दिलं पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांच्या शाळेतील गोष्टी ऐकून घ्या. 3. संध्याकाळच्या वेळी मुलांना मैदानात खेळण्यासाठी, सायकल चालवण्यासाठी पाठवा. 4. मुलांना गोष्टींची, चित्रांची पुस्तके आणून द्या आणि त्यांच्यासोबत स्वतःही वाचनाचा आनंद घ्या. 5. मुलांशी बोला, त्यांच्या शाळेत काय घडलं ते ऐकून घ्या, त्यांच्यासोबत लहान होऊन खेळा.
पालकत्व म्हणजे मुलांवर सतत बंधने घालणे किंवा त्यांना हुकूम सोडणे नव्हे. मुलांचा मोबाइल घालवायचा असेल, तर त्यांच्या आयुष्यात आपली उपस्थिती वाढवावी लागेल. जेव्हा मुलांना वाटेल की digital जगापेक्षा माझ्या पालकांसोबत घालवलेला वेळ अधिक आनंदी आणि सुंदर आहे, तेव्हा मुले स्वतःहून मोबाइल बाजूला ठेवतील.
बदल्या काळातील या आव्हानाला भीतीने नाही, तर प्रेमाने, संयमाने आणि योग्य संवादाने सामोरे जाऊया!
A shelter of four walls