पंचवटी अमरधामजवळ भरधाव कार झाडावर आदळली; युवकाचा मृत्यू

पंचवटी : प्रतिनिधी
तपोवनातून पंचवटी अमरधामकडे जाणार्‍या रस्त्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजता भीषण अपघात झाला. अमरधामच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या झाडावर आदळल्याने भरधाव होंडा सिटी कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात सूरज संजय यादव (21, रा. संकल्पसिद्धी अपार्टमेंट, बी.जी. पब्लिक स्कूलजवळ, सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प) याचा मृत्यू झाला असून, तिघेजण जबर जखमी झाले आहेत.
पहाटे तीन वाजता सुनसान रस्त्यावर छोटेसे वळण असल्याने ते लक्षात न आल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे तीन वाजता भरधाव होंडा सिटी कार (एमएच 01 बीयू 3112) स्वामीनारायण मंदिराकडून अमरधामच्या दिशेने येत होती. कन्नमवार पुलाखाली असलेले खड्डे व पुढे असलेले छोटेसे वळण यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि साधारण 110 किमी वेगाने धावणारी कार झाडावर आदळली. पहाटेच्या निरव शांततेत झालेल्या या भीषण अपघाताच्या आवाजामुळे व जखमींच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिक धावले. पंचवटी पोलिसांना याबाबतची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक निरीक्षक शरद पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, सूरज यादव याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर राजेश हरी ठाकूर, प्रियांशू मोही विश्वकर्मा, सतीश संतोष यादव यांना गंभीर दुखापत झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचे स्पीड मीटर 110 ला लॉक झालेले आढळून आले. सूरज यादव हा कार चालवत होता. त्याच्या डोक्यास, पायास, चेहर्‍यास गंभीर दुखापत झालेली होती.

कारमधील युवक देवळाली कॅम्प, विहितगावचे

अपघातग्रस्त कारमधील युवक देवळाली कॅम्प व विहितगाव परिसरातील असून, मध्यरात्री कुठे जात होते, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नव्हती. मात्र, तपोवनाकडून अमरधाम रस्त्यावर रात्री 10 नंतर फारशी वर्दळ नसते. त्यामुळे पहाटे तीन वाजता भरधाव कार घेऊन युवक कुठे जात होते, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. चारही युवक 21 ते 25 वयोगटातील आहेत. पंचवटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला असून, हवालदार अमोल पाटील तपास करत आहेत. अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना आक्षेपार्ह काहीही आढळलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *