मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजे वाहतुकीचा अखंड कोसळणारा धबधबा आहे. मुंबई ते पुणे अवघ्या तीन तासांवर आणण्याचे संपूर्ण श्रेय या एक्स्प्रेस वेला जाते. पण मंगळवारच्या दुर्घटनेनंतर हा प्रवास 3 तासांऐवजी 30 तासांचा झाल्याने विकासाचे कसे तीनतेरा झाले आहेत, ही बाब ठळकपणे समोर आली आहे.
मंगळवार, दि. 3 फेब्रवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटामधील आडोशी बोगद्याजवळ रसायन वाहून नेणार्या टँकरचा अपघात होतो आणि टँकर उलटतो आणि तेव्हापासून पुण्याहून मुंबईच्या दिशेची वाहतूक ठप्प होते. याकडे कुणीही गांभीर्याने न पाहिल्याने तब्बल 25 किलोमीटर लांबीची वाहनांची रांग लागणे, हजारो लोकांचा खोळंबा होणे याला जबाबदार कोण, याचे उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवे. तसेच 30 तासांनंतरही वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही हे अपयश कुणाचे, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होते. कधी 10-15 मिनिटे तर कधी तास-दीड तास. मात्र, मंगळवार संध्याकाळपासून ठप्प झालेली वाहतूक संथगतीने सुरू व्हायला 24 तास लागत असतील तर वाहतूक व्यवस्थापनाबाबत सरकार किती बेफिकीर आहे, हे दाहक वास्तव समोर येते. या महामार्गावर अपघात, गाड्या उलटणे हे काही नवीन नाही. मात्र, त्यावर तातडीने उपाययोजना होणेही गरजेचे आहे. अपघातानंतर गाड्या जागेवरून हलवून वाहतूक सुरळीत केली जाते. तरीही दीड-दोन तासांचा खोळंबा होतोच, मात्र 30 तासांनंतरही वाहतूक पूर्ववत होत नसेल तर सरकारने वाहतूक (ट्रान्स्पोर्टेशन) धोरण चुकल्याचे मान्य करून तातडीने चूक दुरुस्त करायला हवी. सर्वांत गंभीर बाब म्हणजे टँकर उलटल्यानंतर त्याची दखल तातडीने घेतली गेली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होत गेली. बरं दखल घेतल्यानंतर उपाययोजना काय करणार, हा प्रश्नच होता. रसायन हवेत पसरते तेव्हा त्यावर काय उपाययोजना करावी, याची महामार्गाचे व्यवस्थापन करणार्या कंपनीकडे तजवीज नाही, हीच आश्चर्याची बाब आहे. त्यामुळे भरमसाठ टोल आकारून पश्चात्ताप करावा लागतो, ही हजारो प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. बेफिकिरीचा सर्वांत उत्तम नमुना म्हणजे अशी दुर्घटना घडली तर याची माहिती प्रवाशांपर्यंत आणि वाहनचालकांपर्यंत पोहोचवण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे वाहने येतच होती आणि वाहतूक कोंडीत भर टाकत होती. त्यामुळे वाहनांच्या 20-25 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. वास्तविक अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेची चर्चा होत असताना या बाबींचा विचार व्हायला हवा. मात्र, रस्ता बांधला, टोल वसुली सुरू झाली की सगळे झाले, हीच आपली विकासाची व्याख्या ठरली आहे. या वाहतूक कोंडीत हजारो लोकांची किती गैरसोय झाली याचा सरकारने विचार केला आहे का? त्यांना अन्नपाण्यावाचून राहावे लागले, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला काय आले, याचा विचार तरी सरकारने केला का? वाहतूक कोंडीत अडकलेल्या महिला, ज्येष्ठांचे शौचालयाशिवाय किती हाल झाले असतील, वाहनचालक झोपू शकत नाही आणि गाडी सोडू शकत नाहीत, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा किती ताण त्यांच्यावर पडला असेल, याची जाणीव सरकारला आहे का? एवढंच नाही तर चालक सीट सोडून जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याचेही किती शारीरिक हाल झाले असतील, याचा विचार केला तरी त्रास होईल. मात्र, सरकारला याची जाणीव आहे का, हाच खरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा या घटनेची दखल घेत याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे समजते. तर, बुधवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत गंभीर दखल घेत आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. बाकीच्या नेत्यांना तर महामार्ग सुरू आहे की बंद आहे, याविषयी काहीही देणेघेणे नव्हते. त्यामुळे बुधवारी सकाळी वाहनांच्या रांगा पाहून संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेचे गांभीर्य कळले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा मुंबई-पुण्याला जोडणारा तसेच पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिण भारताला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. आधीच्या मुंबई-पुणे महामार्गाच्या खंडाळा घाटातून नागमोडी प्रवासाला चार ते सहा तास लागायचे. मात्र, एक्स्प्रेस वेमुळे हा प्रवास अडीच ते तीन तासांवर आला. मात्र, मंगळवारसारखी दुर्घटना झाल्यास त्या कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढायचा, याचा विचारच करण्यात आलेला नाही, ही बाब यानिमित्ताने उघड झाली आहे. वास्तविक रसायनाचा टँकर उलटल्यामुळे आणि त्यातून रसायन हवेत मिसळत असल्याने ते घातक होते. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक आधीच इतर मार्गाने वळवायला हवी होती. त्यासाठी संपूर्ण एक्स्प्रेस वेवरील पोलिसांना अलर्ट करायला हवे होते. त्याचवेळी वाहनचालकांना अशा घटनांची माहिती मिळेल आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करतील, अशी व्यवस्था हवी. ही जबाबदारी टोल वसुली करणार्या आयआरबी कंपनीची होती. मात्र, आपल्याकडील वाहतूक व्यवस्थापन प्रचंड ढिसाळ आणि सर्वांत दुर्लक्षित आहे. वाहतुकीचा प्रचंड गोंधळ सुरू असतानाही कंपनीकडून टोलवसुली सुरू होती. एकूणच आपल्याकडील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बँड वाजल्याचे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील दुर्घटनेने दाखवून दिले आहे. यातून धडा घ्यायचा की थातूरमातूर कारणे सांगून वेळ मारून न्यायची, याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे.
A three-hour journey on the Mumbai-Pune Expressway to thirty hours?
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…