आक्रोश आणि आव्हानमय कविता- अंतस्थ हुंकार
लेखिका : डॉ. प्रतिभा जाधव
काव्यसंग्रह- अंतस्थ हुंकार
कवी- डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे
प्रकाशक- हर्मिस प्रकाशन, नांदेड
प्रकाशन वर्ष २०२२
मुखपृष्ठ- संतोष घोंगडे
एकूण पृष्ठ- ११२
मूल्य- रु.१४०
डॉ. शिवाजी नारायण राव शिंदे(सहायक कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ, सोलापुर तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी) यांचा ‘अंतस्थ हुंकार’ हा दुसरा काव्य संग्रह व एकूण ग्रंथसंपदेतील सहावे अपत्य होय. या पूर्वी डॉ.शिवाजी शिंदे यांचे संशोधन पद्धती आणि आय.सी.टी., शिक्षणातील नवविचार प्रवाह, शिक्षणातील प्रगत विकास ही काही संदर्भ पुस्तके, दोन संपादित पुस्तके व ‘कैवार’ हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्याचबरोबर विविध नियतकालिके, वृत्तपत्र यांमधून त्यांनी विविध विषयांवर लेखन केलेले आहे. त्यांच्या ‘कैवार’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्रातील अनेक महत्वाचे सन्मान प्राप्त आहेत. विविध विषयांवर महाराष्ट्रभर डॉ.शिंदे यांची प्रबोधनपर व्याख्याने संपन्न होत असतात.
‘ अंतस्थ हुंकार’ हा त्याचा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. डॉ. मृणालिनी फडणवीस (माजी कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांनी सदर काव्यसंग्रहासाठी शुभेच्छा देताना लिहिले आहे की, “डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे यांनी आपल्या काव्य लेखनाने मराठी साहित्य व्यवहारात स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. प्रशासकीय जबाबदारी पार पाडत असताना सृजनशीलतेलाही त्यांनी जपले आहे. शेतशिवाराचा आवाज म्हणून येणारी त्यांची कविता या संग्रहात प्रामुख्याने भेटते. शेतकऱ्यांच्या जगण्याचा चिवट संघर्ष ते आपल्या कवितेतून मांडत असतात. ह्या लेखनातून कष्टकऱ्यांच्या संघर्षाला, लढण्याला ते बळ पुरवतात. आपल्या भोवतालातील शिक्षण समाज-राजकारण, कुटुंब, नातेसंबंध असे बहुपेडी वीण असणारे वास्तव समाज दर्शन ‘अंतस्थ हुंकार’ मधून कवी शिवाजी शिंदे मांडतात.”
‘अंतस्थ हुंकार’ या काव्यसंग्रहास डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यात ते लिहितात की, “गाव, माती आणि माणुसकीच्या गहिवराने हा ‘अंतस्थ हुंकार’ ओथंबलेला आहे. पाऊस आणि शेतकरी यांचे द्वंद्व या कवितेने समर्थपणे पेलले आहे. ही रचना माणसाच्या जगातील माणसानेच माणसाच्या केलेल्या पराभवाची शोकांतिका सांगणारी आहे. हजारो वर्षांच्या सांस्कृतिक विकासातही माणसाचे पशुत्व शिल्लक असल्याचे सत्य कवी डॉ.शिवाजी शिंदे सुचक काव्यातून सांगू पाहतात. शिवाजी शिंदे यांचे चौफेर लेखन व निरीक्षण हे कमालीचे सूक्ष्म व वस्तुनिष्ठ असून सभोवतालच्या वास्तवाचे अंतरंगी धागे त्यांनी सक्षमपणे काव्यात उलगडले आहेत. जीवन संघर्षात स्वतःला संपवण्याचा विचार न करता परिस्थितीशी दोन हात करून जगण्याचा आशावाद कवीने मांडलेला दिसून येतो. मूल्यवान आयुष्य गमावून आपल्या जिवलगांना दुःखाच्या खाईत लोटणे बरे नाही असा उपदेश ही कविता करते.” ह्या काव्यसंग्रहाची पाठराखण करताना ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार मा. उत्तम कांबळे हे लिहितात कि, “पायाखालचा आणि डोक्यावरचा धगधगता संकल सहजपणे पकडण्याचा प्रयत्न डॉ. शिंदे यांची कविता करते व समकालाच्या कपाळावर ठळकपणे दिसणारे विकृतीचे, विषमतेचे डाग त्याचं कविता अलगदपणे टिपते.”
‘अंतस्थ हुंकार’ या काव्यसंग्रहासाठी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी ‘मातीच्या महतीची आणि हुंकारांची कविता’ या शीर्षकाखाली अभिप्राय नोंदवलेला आहे. त्यात ते म्हणतात की, “अगदी विद्यापीठीय प्रशासनाच्या धबडग्यामध्ये राहून भावनेची ओल, तरल संवेदनशीलता आणि मानवीय कळवळा सांभाळणारे कवी डॉ. शिवाजी शिंदे हे जी कविता लिहितात; ती कविता माणसांच्या निरामय अशा जगण्याचीच आहे. शेतकरी संस्कृतीचा टिळा कपाळी लावून जन्मलेला हा कवी कोणत्याही अभिनेवेशातून अथवा कृतक अहंकारातून कविता लिहीत नाही हे विशेष!”
कृषी जीवनावर आधारित ‘अवकाळी पाऊस’ या कवितेत डॉ.शिंदे लिहितात कि,
‘शासन धोरणे व्यापारी धार्जिणे I अवघड जिणे कुणब्याचेII
अति पावसाने ओले झाले दाणे कुणब्याचे गाणे मातीमोलII अस्मानी सुलतानी जेव्हा बळीराजावर कोसळते तेव्हा तो खचून जातो आणि केव्हा फाशीचा दोरही जवळ करतो तेव्हा त्याची लाडकी लेक खचलेल्या बापाला म्हणते की, ‘परिस्थितीला कंटाळून बाबा तुम्ही नका विष घेऊ
पोरकं करून आम्हा तुम्ही नका देवा घरी जाऊII’
‘बळीराजाची नशिबाने थट्टा केली’ या कवितेत कवी लिहितो की,
‘जशी काळ्याशार ढगात लखकन वीज कडाडली
परतीच्या पावसाची बळीराजाला चाहूल लागली
तवा बळीराजाच्या जीवाची लई घालमेल झाली
पुन्हा एकदा बळीराजाची नशिबाने थट्टा केली’ अशाप्रकारे साऱ्याच प्रकारच्या समस्या ‘आ’ वासून शेतकऱ्यांच्या समोर उभ्या असतात. राजकीय नेत्यांची खोटी आश्वासने, मदत वा कायम उपाययोजनेसाठी, पिक हमी भाव देण्यात इच्छाशक्तीचा असलेला अभाव आणि औपचारिकरित्या फोटो-बातमीपुरते होणारे पाहणी दौरे याबद्दल’ नेत्यांचे दौरे’ या कवितेत डॉ. शिंदे लिहितात की,
‘ हे आले ते पण आले नेत्यांचे दौरे सुरू झाले
आरोप प्रत्यारोप करून गेले
शेतकऱ्यांच्या पदरी काय पडले?
नुसतेच कोरडे सांत्वन फोटोसेशन करून गेले
आम्हालाच किती कळवळा हे सर्व भासवून गेले’ ह्या दांभिक राजकीय वृत्तीवरकवी अचूकपणे बोट ठेवतो. ‘जगणं शेतकऱ्याचं’ या कवितेत डॉ. शिंदे लिहितात की,
‘पुन्हा नेत्यांचे दौरे, घेतील भेटीगाठी आहेत का हे सर्व शेतकऱ्यांच्या पाठी?
कोरडाच कळवळा,उगी आव आणतील, शेतकऱ्यांच्या दुःखावर खरंच मार्ग काढतील?’
याचबरोबर इतर मानवकेंद्रित विषयांवरच्या कविताही ह्या काव्यसंग्रहात आपणास वाचायला मिळतात.
‘माझी म्हणता येणारी असावीत माणसे
आयुष्यात साथ देणारी जपावीत माणसे’ ही जगण्याची लिहिण्याची वाट या कवीने सरळ निवडलेली आहे. त्याचबरोबर ‘हीच ती प्रार्थना नसे दुःख कोणा/ कृपा दया घना ठेवशील//’ एवढ्या सहजतेने प्रार्थनेचा शब्द अगदी आतून आत्मीयतेने हा कवी लिहितो. कुठल्याही व्यवस्थेत समाजात मध्यवर्ती असतो तो माणूस. अशा माणसांच्या बाजूने डॉ. शिंदे यांची लेखणी उभी राहते. ‘शेतशिवारांचे गीत गाणारा माणूस’ या कवितेचा मध्यबिंदू असून गावाची गावकळा रक्तामासात जन्म घेऊन ठाम जगणाऱ्या माणसांच्या अवस्थेची ही कविता आहे.
‘अंतस्थ हुंकार’ या काव्यसंग्रहात एकूण ७४ कविता आहेत. या सर्व कविता लयबद्ध आहेत. सर्व कवितांमध्ये कृषिजीवनाशी निगडीत अधिक कविता आहेत व कष्टकऱ्याची पीडा, प्रेम, माणुसकी जिव्हाळा हे महत्त्वाचे केंद्रतत्व या कवितेत दिसून येते. ग्रामीण मातीशी , माणसांशी त्यांच्या दुःख, प्रश्न, समस्येशी नाळ जोडणारी ही कविता आहे. कवीची जडणघडण ह्या गावात, गावपांढरीत झाले त्याच्याशी कवीचे असणारे अतूट सख्य ह्या कविता वाचताना अधोरेखित होते. कवी आज जरी उच्चशिक्षित होऊन एका विद्यापीठात कार्यरत असला तरीही त्याच्या पायाची माती नाही. त्याच्या मनात आजही गावातल्या शेतीमातीचा मृदगंध दरवळतो आहे. , त्याच्यावर येणारी नैसर्गिक आपत्ती हे सांगणारी त्यांची पहिलीच कविता आहे ‘महापूर’. त्यात ते म्हणतात,
‘पाऊस धोधार I स्थिती ही गंभीरI चोहीकडे पूरI कोकणातII
असा कसा सांगI निसर्गा कहरI आला महापूरI घेऊनियाII
निसर्गाचा कोपI मनी थरकापII होतो मन:स्ताप पुराचा याII’ अशा प्रकारे अगदी मोजक्या शब्दात अभंगवजा रचना ते करतात. त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेमक्या- मोजक्या विशिष्ट शब्दांमध्ये व्यक्तिचित्रणही करतात. उदा. ‘अनाथांची माय’ म्हणून ज्यांना संबोधले जाते अशा सिंधुताई सपकाळ यांच्या विषयीची ‘अनाथांची माय’. त्याचप्रमाणे भाई. एन. डी. पाटील यांच्याविषयीची कविता होय. उदा. ‘नाही ऐटबाज I ना सत्तेचा साजI बुलंद आवाजI सामन्यांचाI तत्वनिष्ठ नेता I तत्वनिष्ठ हिंमत प्रबळI त्यांना तळमळI गरिबांचीII’
कोरोनाकाळातील नाना दु:ख-वेदनांची दखल त्यांची कविता घेते. ‘आई-बाबा हिरावल्यानंतर’ या कवितेत ते म्हणतात की, ‘कोरोना हरवून येऊ परतून दिले ना वचन आई बाबा
कोरोनाने घाला घरावरी हल्ला आई नि बाबाला दूर नेले
आमचा आधार गेला फार दूर दिला भारत
शोधते नजर वाटेकडेII’ किंवा याच विषयावरील कोरोना महामारी, कोरोनाची दाहकता, पांडुरंगा थांबव आता मृत्यूचे तांडव रे! ह्या कविता आहेत.
या काव्यसंग्रहातील एक उल्लेखनीय कविता म्हणजे ‘माणसा’ त्यात कवी लिहितो कि,
‘लक्षात असू दे सत्याला अनंत अडचणी असतात
पण सत्य कधीच पराभूत होत नसतं
सगळं संपलय असं वाटत असताना
स्वकर्तुत्वावर तूच गगन भरारी घेऊ शकशील
कारण तूच आहे तुझा जीवनात शिल्पकार
आणि घे भरारी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे!
हेही लक्षात असू दे ,
अपयश बिचारं एकटं, अनाथ आणि पोरकं असतं
यशाला मात्र असंख्य नातेवाईक असतात रं
रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे परिस्थितीनुसार बदलणारी माणसं
पावलोपावली तुला भेटतील
अशा माणसांची पारख असायला हवी तुला!’
असा महत्त्वाचा वस्तुस्थितीदर्शक संदेशही ते आपल्या कवितेतून देतात.
‘महिला अत्याचार’ या विषयावरील ‘अत्याचाराच्या बळी’ शीर्षकाच्या कवितेत ते लिहितात कि,
‘पुन्हा अल्पवयीन कोवळी कळी पुरुषी अत्याचाराची ठरली बळी
व्यवस्था झाली खिळखिळी बोलण्यास त्यांची बसते दातखिळी’
‘सन्मान’ नावाची त्यांची आठच ओळींची जी कविता आहे ती ही खूप महत्त्वाची आहे. त्यात ते लिहीतात की, ‘माणसाने माणसाला सन्मान द्यावा परस्परांमध्ये एकोप निर्माण व्हावा
जाणिवेचा भाव साऱ्यांनी जपावा मनामनांत स्नेह वृद्धिंगत व्हावा’
अलीकडच्या फसव्या जगात आणि नाना मानवी वृत्ती-प्रवृत्तीच्या या सगळ्या गोंधळात कवी म्हणतो की,
‘म्हणून मित्रा जरा माणसाप्रमाणे वाग दिलेल्या शब्दाला तू थोडं तरी जाग’. कविता या सशक्त माध्यमातून कवी आपल्या भावना व्यक्त करतो त्या कवितेचा अर्थ उलगडून सांगताना कवी लिहितो कि,
‘कविता म्हणजे काय ? कविता अंतरीचा ठाव ,मनातला भाव
उजाडलेला गाव, जिव्हारीचा घाव
सुरेल अबोल प्रीत, वाहणारा निर्मळ झरा,
पहाटेचा मंद वारा, कविता सुखदुःखाची किनार स्वप्नांचा आगर’.
एकूणच डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे यांच्या ‘अंतस्थ हुंकार’ मधील कविता सामाजिक जाणीवेने
ओतप्रोत अशा व्यापक भूमिकेतून लिहिलेल्या कविता आहेत अंतरंगातील अस्वस्थ खळबळ ते प्रांजळपणे व्यक्त करतात. त्यांच्या आगामी लेखनास स्नेहपूर्वक सदिच्छा!
– डॉ.प्रतिभा जाधव, नाशिक
pratibhajadhav279@gmail.com
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…
सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…