शेताच्या बांधावर बसून खाल्लेल्या चार घास न्याहारीची चव काही औरच लागते ना! आपल्या बळीराजाला तर घरातल्यापेक्षा त्याच्या शेतात बांधावर बसून न्याहारी करायला खूप आवडतं. घरातून निघताना तो चार-दोन घास अगदी घाईत खातो. आणि शेतात गेल्यावर मात्र मोकळ्या आभाळाखाली, शेतातल्या काळ्या मातीवर मांडी घालून बसून अन् तिच्या सान्निध्यात तिनेच आपल्याला दिलेली भाकर खात जणू तिचे आभार मानत बहरलेल्या त्या हिरव्यागार शेताकडे न्याहाळत असतो. आणि त्या आभाळाचेही आभार मानत असतो. यात कृतार्थ भावही दिसून येतो. कारण ते आभाळ वेळोवेळी बरसत असते वेळेवर म्हणूनच दोन वेळचे आपल्याला पोटभर मिळतं याची त्याला जाणीव असते. तेव्हा नक्कीच मात्र चार घास त्याच्या उदरात जास्तच जातात अन् तृप्तीचा ढेकरही येतो.
त्यातला म्हणजे त्याच्या न्याहारीतला काही वाटा हा त्याच्या लाडक्या मोती कुत्र्याचा तर हमखास असतोच. पण काही त्या पाखरांचाही असतो. तो जेवायला बसला की झाडावरची चिवचिव, कावकावही वाढते. एवढंच काय तर तो जेवायला बसला की अगदी त्या इवल्या मुंग्यासुद्धा जवळ येतात हो! त्याच्या न्याहारीतला त्यांचाही वाटा घ्यायला. जणू सारेजण त्याची वाटच पाहत असतात. आणि म्हणूनच की काय त्याला घरात न्याहारी मात्र काही गोड लागत नाही आणि मग तो शेतावरती जाताना ती सोबत बांधून नेतो आणि तिकडे गेल्यावर मात्र आनंदाने त्या सार्यांसोबत पोटभर खातो. कधी घाईघाईत निघाला किंवा विसरला तर त्याची सहचारिणी पाठीमागून डोक्यावर पाटीमध्ये न्याहारीची भाकरी बांधून घेऊन जातेच.
हा सारा अनुभव मलाही लहानपणी मामाच्या घरी गेल्यावर यायचा. शेताच्या अगदी जवळच म्हणजे अगदीच हाकेच्या अंतरावर घर असूनही मामा आरोळी देऊन भाकरी मात्र शेतातच मागवायचा. बैलजोडी सावलीला बांधून आणि बांधावर बसून जेवायचा. शिवारानं दिलेलं शिवाराच्याच हव्याहव्याशा अशा सान्निध्यात मोकळ्या आभाळाखाली बसून खायचं. त्याची न्याहारी होईपर्यंत बैलांचाही चारा खाऊन व्हायचा. खरंच खूप छान अनुभव असतो.
खरंच बळीराजाचे ऋणानुबंध खूप घट्ट असतात. ती काळी माती, ते हिरवं शिवार, ते आभाळ अन् निसर्गाशी निगडित त्या हरेक घटकाशी. भलेही मग त्यात नसतील गोडधोड पक्वान्नं, भलेही एकच भाजीभाकर असेल पण सोबत जर झणझणीत चटणी, कांदा आणि ताकाचा काठोकाठ भरलेला तांब्या असला की मग बस्स! त्याला मात्र तुमचं बाकी दुसरं काहीही नको असतं. खरंच महागड्या, आलिशान हॉटेलातल्या त्या सजवलेल्या टेबल-खुर्चीवर बसून आणि पंचपक्वान्नाने भरून खाल्लेल्या ताटालाही मागे टाकते ही बांधावर मांडी घालून बसून खाल्लेली न्याहारी आणि हे सारं मात्र ती स्वतः खाऊन अनुभवल्याशिवाय काही कुणाला कळणारच नाही…
वंदना गांगुर्डे
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…