पांडवलेणीच्या पायथ्याशी गुटख्याच्या बेवारस गोण्या

तपासात पानमसाल्याचा साठा आढळला

सिडको : विशेष प्रतिनिधी
मुंबई महामार्गावरील पांडवलेणी परिसराच्या पायथ्याशी शुक्रवारी सकाळी दोन बेवारस गोण्या आढळून आल्याने काही काळ खळबळ उडाली. गोण्यांमधून लालसर द्रव बाहेर येत असल्याचे दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात त्या गोण्यांमध्ये पानमसाला व खाण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मसाल्यांचा साठा असल्याचे स्पष्ट झाले.
पांडवलेणी परिसरात सकाळी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला संशयास्पद गोण्या पडलेल्या दिसल्या. त्यामधून लालसर द्रव बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण
निर्माण झाले.
कोणताही धोका पत्करायचा नसल्याने नागरिकांनी तातडीने इंदिरानगर पोलिसांना
माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली आणि गोण्या ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. प्राथमिक तपासात या गोण्यांमध्ये खायच्या पानामध्ये वापरला जाणारा मसाला आणि संबंधित साहित्य असल्याचे निष्पन्न झाले. कोणतीही संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू आढळून आली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे काही काळ निर्माण झालेली भीती दूर झाली असून, नागरिकांनी सुटकेचा
निःश्वास सोडला. दरम्यान, या गोण्या नेमक्या कोणी आणि कोणत्या उद्देशाने टाकल्या, याबाबत इंदिरानगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Abandoned sacks of gutkha at the foot of Pandavleni

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *