जिल्ह्यात मराठी नामफलकाचा अधिनियम लागू
:कामगार उपायुक्त वि.ना.माळी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे, असे कामगार उपायुक्त वि.ना.माळी यांनी कळविले आहे.
राज्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेत असण्याकरीता १७ मार्च २०२२ रोजी शासनाने अधिसुचना प्रसिध्द केलेली आहे. यानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापनांना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम,२०१७ च्या कलम ३६ क-१ कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाने व आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम ७ लागु आहे. त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक, देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच या आस्थापनेच्या नियोक्त्याकडे, देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक लावता येणार आहे. अशी माहिती ही कामगार उपायुक्त वि.ना.माळी यांनी दिली आहे.
याबरोबरच मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरूवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार (Font) हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या दुकाने व आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते अशा दुकाने व आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तीची किंवा गड-किल्यांची नावे लिहिता येणार नाहीत, अशी तरतूद या अधिनियमात करण्यात आली आहे. या अधिसुचनेची जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी काटेकोरपणे अंमबजावणी करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त माळी यांनी केले आहे.
|
|