सातपूरला कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 35 जणांवर कारवाई

सातपूर : प्रतिनिधी

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी आणि टवाळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सर्व हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सातपूर भागात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवत 35 जणांवर कारवाई करण्यात आली.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची सायंकाळी झाडाझडती घेण्यात आली. सातपूर, स्वारबाबानगर, श्रमिकनगर भागात असलेल्या झोपडपट्टीत ही मोहीम राबविण्यात आली. सातपूरच्या प्रबुद्धनगर, श्रमिकनगर आदी वेगवेगळ्या भागात अचानकपणे सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सातपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईत रेकॉर्डवरील संशयित आरोपींची तपासणी करणे, संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन कारवाई करणे, टवाळखोरांवर कारवाई, फरारी आरोपींचा शोध घेण्यासह बेकायदा शस्त्र बाळगणार्‍या व्यक्तींवर कारवाया करण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी कुठल्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला न घाबरता सातपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *