महिलेने साथीदारासह अश्लील व्हिडिओ क्लिप बनवत उकळले चाळीस लाख
संगमनेर : अनंत पांगारकर
गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महिलेशी झालेल्या ओळखीचे रूपांतर थेट अश्लील व्हिडिओ काढण्यापर्यंत जाऊन पोहोचले. हनी ट्रॅपच्या या प्रकरणात संबंधित महिला आणि तिच्या साथीदाराने पंचायत समिती सदस्यालाच चाळीस लाखांहून अधिक रुपयांना गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. संबंधित पदाधिकारी आणि महिला संगमनेर तालुक्यातील असून यासंदर्भातील गुन्हा मात्र शिर्डी मध्ये दाखल झाला आहे.
शिर्डी पोलिसांनी सापळा लावत संबंधित पदाधिकाऱ्यांकडून महिला आणि तिच्या साथीदाराला चार लाख रुपये स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान या प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या प्रकारामुळे हनी ट्रॅपची आणखी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या आणि तत्कालीन पंचायत समिती सदस्य असलेल्या या पदाधिकाऱ्याची ओळख गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील या महिलेसोबत झाली होती. या ओळखीतून संबंधित महिलेला या पदाधिकाऱ्याने तब्बल दोन लाख रुपये उसने दिले होते. ते पैसे महिलेने पंधरा दिवसात परत केल्यानंतर पुन्हा पैशाची गरज असल्याचे सांगत पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा नेवासे येथील आपल्या शेतीच्या व्यवहारासाठी 15 लाख रुपये घेतले होते. हा प्रकार 2018 मध्ये मे व जून या महिन्यात घडला.
त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याने पैसे परत मिळण्यासाठी या महिलेशी वारंवार संपर्क साधला असता तिने या पदाधिकाऱ्याचे फोन उचलले नाही. 7 मार्च 2022 रोजी संबंधित महिलेने फोन घेत पैसे घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी या पदाधिकाऱ्याला बाभळेश्वर येथे बोलाविले. संबंधित पदाधिकारी दुसऱ्या दिवशी बाभळेश्वर येथे गेला असता एका हॉटेलजवळ त्याची या महिलेशी भेट झाली. यावेळी संबंधित महिलेने आपल्याकडील पिशवीतील पैसे या पदाधिकाऱ्याला दाखविले व रस्त्यात पैसे मोजू नका, मी हॉटेलमध्ये रूम घेतली आहे. तेथे हे पैसे मोजा, असे सांगत ती त्याला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेली. संबंधित पदाधिकारी व महिला हॉटेलमध्ये गेले असता तिने तातडीने रूमचा दरवाजा बंद करून घेतला. यावेळी तेथे आलेल्या आणखी एका इसमाने दरवाजा वाजवत दार उघडण्यास भाग पाडले. संबंधित व्यक्ती आत येताच त्याने मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. यावेळी संबंधित महिलेने अंगावरील कपडे काढले तसेच पदाधिकाऱ्याकडून या महिलेसोबत शरीर संबंध असल्याचे वदवून घेतले. मोबाईलवरील रेकॉर्डिंग व्हायरल न करण्यासाठी या दोघांनी पदाधिकाऱ्यांकडे आणखी पैशाची मागणी केली.
मात्र पदाधिकाऱ्यांनी आपल्या जवळ पैसे नसल्याचे सांगत दुसऱ्या दिवशी साडेचार लाख रुपये देण्याचे कबूल केले. तसेच दुसऱ्या दिवशी साडेचार लाख रुपये या महिलेच्या साथीदाराला तालुक्यातील समनापुर येथे दिले. त्यानंतर मात्र महिला आणि तिच्या साथीदाराने या पदाधिकाऱ्यांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली वारंवार या दोघांनी पदाधिकाऱ्यांकडून संगमनेर मधून तब्बल चाळीस लाखावर रक्कम उकळली आहे. संबंधित महिला आणि तिच्या साथीदाराकडून सातत्याने होणाऱ्या आर्थिक मागणीला कंटाळून अखेर या पदाधिकाऱ्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली.
शिर्डी येथे चार लाख रुपये देण्याचे निश्चित झाल्यानंतर पंचायत समितीच्या या पदाधिकाऱ्याने शिर्डी पोलिसांच्या मदतीने संबंधित महिला आणि तिच्या साथीदाराला पकडण्यासाठी सापळा लावला. चार लाख रुपयांची रोकड स्वीकारतांना महिला आणि तिचा साथीदार शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयाजवळील बसस्थानक चौकात रंगेहाथ पकडले गेल्यानंतर त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही अनोळखी महिला किंवा मुलीची रिकवेस्ट स्वीकारू नये.सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी खासगी संभाषण करू नये.तसेच ऑनलाईन कोणत्याही अश्लील संभाषण किंवा वर्तन करू नये.तसेच त्याबाबत कोणी धमकी देत असल्यास किंवा खंडणी मागत असल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशनला संपर्क साधावा.
– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ञ)