सिडको : विशेष प्रतिनिधी
कॉलेजरोड परिसरात कर्णकर्कश आवाज करणारे आणि फटाके वाजविणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणार्या बुलेटचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जप्त केलेले तब्बल 112 मॉडिफाइड सायलेन्सर गुरुवारी रोडरोलरखाली टाकून
नष्ट केले.
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेजरोड परिसरात काही बुलेटचालकांकडून मोठ्या आवाजाचे तसेच फटाके फोडणारे सायलेन्सर वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाने विशेष मोहीम राबवत विविध वाहनचालकांवर कारवाई केली. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले मॉडिफाइड सायलेन्सर काढून ते कॉलेजरोड पोलीस चौकी येथे जप्त करण्यात आले होते. कॉलेजरोड पोलीस चौकी येथे जप्त करण्यात आलेल्या 112 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. यापुढेही अशा प्रकारचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणार्या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला. ही कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.
Action against bullet drivers using silencers