विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा इशारा नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर गोदावरी संवर्धनाबाबत उच्च न्यायालयाचे निर्णय, गोदावरी प्रदूषण नियंत्रण समिती, उपसमित्यांच्या कामकाजाची माहिती अपलोड करण्यासोबतच नागरिकांसाठी तक्रार कक्षही सुरु करावा. तसेच औद्योगिक वसाहतीतून प्रदूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्याविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी,अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त गमे बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, विभागीय आयुक्त कार्यालयातील सहआयुक्त (करमणुक) कुंदन सोनवणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, डॉ आवेश पलोड, याचिकाकर्ते राजेश पंडित, निशिकांत पगारे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तयार करण्यात आलेल्या गोदावरी संवर्धन कक्ष या कॉलम मध्ये नागरिकांच्या तक्रारीसाठीही जागा देण्यात यावी. तसेच तक्रारीमंध्ये फोटो अपलोड करण्याची सुविधाही ठेवावी. या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपायुक्तांची नेमणूक करावी. अशापद्धतीने काम केल्यास समितीच्या कामकाजाला गती येईल, असे श्री.गमे यांनी यावेळी सांगितले.
प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा शेती व उद्योगांसाठी पुनर्वापर वापर करता येईल का, याचा संबधित यंत्रणेने अभ्यास करुन तसा अहवाल द्यावा. रामवाडी ते अहिल्याबाई होळकर पूल या परिसरात गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पानवेली वाढल्या आहेत. त्या पानवेली काढून त्या नदी किनाऱ्यावर न ठेवता कचरा डेपोत कंपोस्ट करण्यासाठी नेण्यात याव्यात. तसेच पाणवेलींवर फवारणी करुन पाणवेली नष्ट करण्याबाबत अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गोदापात्र दूषित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
गोदापात्रात कपडे, वाहने, त्याच बरोबर प्राणी धुण्यास प्रतिबंध करुन नियंमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच दशक्रिया व इतर पुजेचे साहित्य गोदापात्रात टाकले जावू नये यासाठी उपायायोजना करण्यात याव्यात. तसेच भाविकांनी निर्माल्य गोदापात्रात न टाकता निर्माल्य कलशात टाकावे, अशा सूचनांचे जागोजागी फलक लावून त्या खाली नागरिकांनी तक्रारीसाठी संबंधित यंत्रणेचा संपर्क क्रमांकही द्यावा. तसेच निर्माल्य कलश महापालिकेने दररोज रिकामे करावे, अशा सूचनाही गमे यांनी यावेळी दिल्या आहेत.
गोदापात्राच्या किनाऱ्यावर ई-टॉलेटची व्यवस्था
रामकुंडावर देशभरातून पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणावर येताता. गोदापात्राच्या परिसरातील स्वच्छता कायम असावी. तसेच भाविकांच्या सोयीसाठी गोदावरी किनाऱ्यावर सुलभ शौचालया ऐवजी ई-टॉलेटची उभारावे, असेही श्री.गमे यांनी यावेळी सांगितले. तसेच रामकुंडावरील वस्त्रातंरणगृह येथे गोदावरी संवर्धन कक्षास जागा उपलब्ध करुन घ्यावी.
गोदावरी संवर्धनासाठी जनजागृती भर
गोदावरी नदी पात्रातील प्रदूषण टाळण्यासाठी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृतीपर कार्यक्रम राबविणे. तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून, जाहिरात फलकाद्वारे आणि इतर माध्यमाद्वारे गोदावरी संवर्धनाबाबत जनजागृती करावी, असेही गमे यांनी यावेळी सांगितले.
|
|