महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोळे हे सध्या पंजाब कॉंग्रेसचे माजी वादग्रस्त क्रिकेटपटू अध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्या पावलांवर पाऊल टाकून जात आहेत अस वाटत. दोघांचीही सांसदीय कारकीर्द भाजपमधूनच सुरू झाली. आणि आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचा समान मुद्द्यावर दोघांनीही हिंदुत्ववादी पक्षाला रामराम ठोकत कॉंग्रेसमध्ये
प्रवेश केला.तशी दोघांचीही नाळ कॉंग्रेसशी
जुळलेली. सिद्धू चे वडील आणि पंजाबचे माझी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग मित्र आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी. पाटोळे सुद्धा युवक कॉंग्रेस मध्ये होते.पण अमृसरहून उमेदवारी न मिळण्याच्या मुद्द्यावर सिद्धू कॉंग्रेसमध्ये आले . मंत्री झाले.पण त्यांच्या महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाच्या होत्या.त्यामुळे ज्या अमरिंदर सिंग यांनी त्यांना कॉंग्रेसमध्ये आणल होत त्याच कॅप्टन चा विरोधात त्यांनी बंड केलं. अर्थात त्याला राहुल गांधी यांचा आशीर्वाद होता आणि म्हणून शेवटी त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. पण त्याचा फायदा कॉंग्रेसला काहीही झालं नाही आणि 117 आमदारांच्या विधानसभेत कॉंग्रेसचे केवळ 18 आमदार येऊ शकले आणि सिद्धूना राजीनामा द्यावा लागला.
गेल्या लोकसभेत भंडार्याचे भाजपचे
खासदार असलेल्या नानांनी कृषी विषयावर आपल्याला पंतप्रधानांसमोर बोलू दिलं जातं नाही या मुद्द्यावर 2017 साली भाजप सोडला आणि राहुल गांधींच्या आशीर्वादाने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.2019 क्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींच्या विरुद्ध नाना फारसा करिष्मा दाखवू शकले नाहीत पण आमदार म्हणून निवडून आले आणि महविकास आघाडीच्या सरकारमध्ये चक्क विधानसभा अध्यक्ष बनले.पण त्यांचा डोळा ऊर्जामंत्री पदावर होता.हे खात नितीन राऊत यांच्याकडे. राऊत पाटोळे वाद मीडियामध्ये चांगलाच गाजला. पण शेवटी गेल्या वर्षी मंत्री पद नव्हे तर प्रदेशाध्यक्ष पद मिळालं याच समाधान मानत नानानी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि कॉंग्रेस त्यांच्या हातात असलेल्या एकमेव मोठ्या पदाला मुकला. आज गेली एक वर्ष विविध कारणांनी विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणुकीत होत
नसून विधानसभेचे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याच हातात सर्व कारभार आहे. जर मंत्रीपद किंवा प्रदेशाध्यक्ष पदच घेण्यात नानांना इंटरेस्ट होता तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पद स्वीकारायला नको होत. पण त्यांच्या राजीनाम्यामुळे आधीच कमी पदे असलेल्या कॉंग्रेसचे एक पद कमी झाले.
एक वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे की महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल तीन पक्षांचं सरकार केवळ शरद पवार यांच्यामुळे अस्तित्वात आलं आणि गेली अडीच वर्ष सुरू आहे. वार्धक्य आणि प्रकृती अस्वास्थ्य असतानाही पवार सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आहेत.दुसर्या शब्दात केवळ पवार आहेत म्हणून सरकार सुरू आहे. त्यातही पवार आणि ठाकरे हे नातेवाईक. आज या दोन पक्षांचे मिळून 110 आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सोडून या दोन पक्षांनी युती केली तर कदाचित त्यांची संख्या 125 पर्यंत पोचू शकते. त्यामुळे
देशात गलितगात्र अवस्थेत असलेल्या कॉंग्रेसला पवारांशी पंगा घेऊन महाराष्ट्रासारख्या आर्थिक दृष्ट्या सधन असलेल्या राज्याला सोडण परवडणार नाही. पण नाना नेमकी तीच चूक करत आहेत भंडारा, गोंदिया येथील दोन छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत. त्यातही काही महिन्यात 40 हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असताना. मुंबई महापालिकेत केवळ 30 नगरसेवक असलेल्या कॉंग्रेसला शिवसेनेच्या साथीशिवाय जास्त जागा मिळविता येणार नाही.
कॉंग्रेसने हे कधीही विसरता कामा नये की केवळ पवारांच्या मुळे त्यांना उद्धव ठाकरे नावाचा हिंदुत्ववादी चेहरा मिळालं आहे. अन्यथा याच राहुल गांधींना आपल गोत्र सांगून सोमनाथच्या मंदिरात जाऊन हिंदुत्वाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करावा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या सधन राज्यात एक तृतीयांश का होईना पण सत्ता आणि हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे मिळवून दिल्याबद्दल कॉंग्रेसने पवारांचे आभारच मानले पाहिजेत.
अर्थात कॉंग्रेसला शिवसेनेमुळे जसा हिंदुत्ववादी चेहरा मिळाला तसाच शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मुळे मुख्यमंत्री पद आणि निधर्मी चेहरा मिळाला हेही नाकारून चालणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांमध्ये व्यक्तिगत वादांमुळे बिघाडी होण नवीन नाही. त्यातच भंडारा , गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि नाना पाटोळे यांचं विळ्या भोपळ्या एवढं सख्य असल्याने या विषयाला एकदम राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत वाढवणं सर्वस्वी अयोग्य.पण घाईत असलेल्या नानांनी ते केलं. सिद्धुंच्या अमरिंदर सिंग विरोधातील कारवायांना राहुल, प्रियांका यांचा आशीर्वाद होता.तसा आशीर्वाद नानांना आहे अस मला वाटत नाही. कारण शरद पवारांना दुखावण्याची ताकद आणि इच्छा सध्या कॉंग्रेसमध्ये कोणाचीच नाही. कारण तस केल्यास उरल्या सुरल्या एक तृतीयांश सत्तेवर पाणी सोडावं लागेल. आणि त्याचबोबरीने मुंबई महापालिकेवर!
भंडारा-गोंदियातील पटेल-पटोले वाद काही नवा नाही. खूप कमी प्रसंगात दोन्ही नेते एकत्र आले आहेत. मात्र, एकमेकांवर मात देण्याची संधी दोन्ही नेत्यांनी क्वचितच दवडली असेल. भंडारा- गोंदिया जिल्हा परिषदेचे निकाल आले तेव्हाच एकमेकांचे प्रस्थ मोडित काढण्यासाठी गोलमाल होईल, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. गोंदियात दोन अपक्षांची साथ मिळाल्याने तशीही भाजपच बहुमतात होती. मात्र, त्यानंतरही गोंदियात भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतले. भंडार्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आली असती तर आघाडी धर्म पाळल्या गेला असता. मात्र, नेतेच आपसात बसले नाहीत. येथे पटोलेंनी राष्ट्रवादीला दूर सारत भाजपचे माजी आ. चरण वाघमारे यांच्या मदतीने भाजपच्याच 5 सदस्यांचा गट फोडला व सत्ता स्थापन केली. कॉंग्रेसने आघाडीधर्म मोडला व अध्यक्षपद मिळवले.
त्यामुळे तीन पक्ष जर या दोन्ही जिल्ह्यात एकत्र राहिले असते तर हे प्रकरण एवढं वाढल नसतं.आणि अजूनही या दोन्ही ठिकाणी सामोपचाराने मार्ग निघू शकतो अस वाटत. कारण इच्छा आहे तिथे मार्ग आहे! आता ही इच्छा कॉंग्रेस दाखवत की पंजाबच्या नवज्योतसिंग सिद्धुंची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करत
हेच बघायचं! तूर्तास इतकेच!
जयंत माईणकर