व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट करणे पडले महागात

नाशिक : व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये समाविष्ट केल्याच्या कारणातून झालेल्या हाणामारीत दोघा संशयितांनी पंचवटीतील विजयनगर कॉलनीमधील एका युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात दीपक डावरे (वय 21, रा. संत जनार्दन स्वामीनगर, आडगाव नाका) हा गंभीर जखमी झाला आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शुक्रवारी मित्रांचा व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला होता. यात संशयित हल्लेखोर दोघांना समाविष्ट केले होते. मात्र, आम्हाला ग्रुपमध्ये का समाविष्ट केले, डिलीट कर, असे म्हणत संशयितांनी शिवीगाळ केली होती. यावर शनिवारी दीपक व अन्य मित्र क्रिकेट खेळत असताना दीपकने संशयितांना फोन लावून काय झाले असेल ते मिटवून घेऊ, असे म्हणत देवी मंदिर भागातील मैदानावर बोलावून घेतले. ग्रुपमध्ये ऍड केल्याने काय झाले, असे दीपकने म्हटल्यावर बाचाबाची झाली. संशयिताने दुचाकीच्या मॅटखाली ठेवलेला कोयता काढून दीपकवर वार केले. यात दीपक हा गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दीपकला पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. यावेळी हल्लेखोरांनी कोयता व दुचाकी सोडून पळ काढला. घटनास्थळावरील काही मित्रांनी जखमी दीपकला उपचारार्थ शासकीय रुग्णालयात नेले. नंतर त्यास खासगी रुग्णालयात हलविले. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, दोघा विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *