– वासवदत्ता अग्निहोत्री
थोडं तिकडे सरकता का दादा, जऽऽऽऽऽरा अॅडजस्ट करून घ्या ना…इथेच उतरायचं आहे.. नविन घरात गेल्यावर बरंच अॅडजस्ट करावं लागेल, थोडं समजून घेत जा…आपल्या घरच्यासारखं नाही चालणार… असे संवाद नेहमीच आपल्या कानावर पडत असतात. खरंतर माणूस नेहमीच अॅडजस्ट करत असतो. वयोमानानुसार त्याला अॅडजस्टमेंट करण्याची सवय लागते. डोंबारी आपल्या खेळात, दोन बांबूवर बांधलेल्या दोरीवर, आपल्या लेकीला संतुलन साधायला शिकवतो तसं आईबाप आपल्या अपत्यांना दुनियादारीत संतुलन साधायला, सुरवातीपासूनच शिकवतात. शाळेचे दप्तर उसवले, चांभाराकडून शिवून घे, शर्ट फाटला… आण दोन टाके घालून देते…,कप फुटला… अरेरे चला बशी कामात येईल. ह्या आणि अशा अनेक गोष्टींवर आपण अॅडजस्ट करतो. हीच गोष्ट मोठेपणी अनेक जागेवर कामास येते. शालेय जीवनात, सामाजिक जीवनात, गृहस्थ झाल्यावर, आणि आयुष्यात खूप जागी आपल्याला अॅडजस्ट करावे लागते.
सरकारी वाहनातून प्रवास करताना, अॅडजस्ट करण्यात येते. सभासमारंभात जागेसाठी संघर्ष न करता आपण अॅडजस्ट करतो. शेजारी कुणी दर्शक, श्रोता आल्यावर, जरा सरकून त्यालाही बसायला जागा करून देतो. फक्त जागेसाठीच नाही तर लहान असताना, आई जास्त भावंड असले तर खाऊदेखील वाटून, अॅडजस्ट करून देत असे.
वाढत्या जनसंख्येमुळे आता जागेची टंचाई निर्माण झाली आहे. छोट्याच जागेेसाठी खूप किंमत मोजावी लागते म्हणून आता ’शेअरिंग’ हा शब्द निघाला आहे. चार मुलं किंवा चार मुली, एक जागा भाड्याने घेऊन, मिळून राहतात आणि अॅडजस्ट करतात. महानगरीय संस्कृतीत अशी घरं सुद्धा निर्माण करतात, जिथे भाडं भरून राहण्याची सोय होते. लहान घरात तर जागेचा प्रश्न सातत्याने असतोच. तिथेही सर्व जुजबी सामान अॅडजस्ट करुनच ठेवावे लागते. अॅडजस्टमेंट करण्यास आता अनेक उपाय निर्माण झाले आहेत.
फोल्डिंग टेबल, खुर्च्या, पलंग, असे अनेक प्रकार आता निर्मित होत आहेत. जशी जनसंख्या वाढत आहे, गरजेच्या वस्तू अपुर्या पडत आहेत. घरं लहान झाली आहेत त्यामुळे त्यातील फर्निचर ही तसेच ठेवणे आवश्यक आहे.
आधी संयुक्त कुटुंबात बरेच लोक रहात असत. जुने वाडे किंवा जुनी घरं, ऐसपैस असत त्याशिवाय प्रत्येकाला वेगळ्या खोल्या वगैरे असली काही भानगड नव्हतीच म्हणून घरं पुरत होती. बायका- मुलं एका ठिकाणी आणि कर्ते पुरुष दुसर्या स्थानावर झोपत असत. बेडरूम नावाची संस्था तेव्हा उदयास नव्हती आली.
थोडक्यात, अॅडजस्टमेंट म्हणजे काय? खपवून घेणे आणि आनंदाने सामावून घेणे. आज भारतीय संस्कृतीत घरं मोडतात, लग्नानंतर सून मुलगा वेगळं घर घेऊन रहातात. वृद्ध आईबाप, तरुण सूनबाई ला नकोसे होतात. प्रत्येक वृद्ध आज कुठल्याही परिस्थितीत अॅडजस्टमेंट करण्यास प्रवृत्त असतो. बदलत्या काळानुसार वृद्ध लोक ही समजून घेतात, पण तरुणाईला हे कळत नाही. नवरा-बायको परस्पर अॅडजस्टमेंट करण्यास तारेवरील कसरत करतात, पण त्यांना आपल्याच आईवडिलांची, त्यांच्या अनुभवांची मदत नको असते. नवीन लग्नानंतर तर आईबाप ’डस्टबीन’ म्हणजेच केराचे डबे होतात, पण मुलं झाल्यानंतर त्यांना ’बेबीसिटिंग’चे काम (मुलं साभाळणारे) दिलं की ते निर्धास्त होतात की, चला आपण काही तरी उपयोगी आहोत आपल्या मुलांसाठी… पण तीच मुलं थोडी मोठी झाल्यावर शाळेत जायला लागली की पुन्हा आईबापांचा त्रास होऊ लागतो आणि ते नकोसे होतात. तशातही आईवडील अॅडजस्टमेंट करू इच्छितात. कारण ते आणिक वृद्ध झालेले असतात. त्यामुळे त्यांची काळजी जास्त घ्यावी लागणार आणि म्हणतात की, वृद्ध आणि लहान मूल एकसारखेच असतात. अॅडजस्टमेंट करता करता वयोवृद्ध लोक जेरीस येतात, पण तरीदेखील ते आपल्या तरुण मुलांच्या राज्यात अॅडजस्ट होऊ शकत नाहीत कारण ते त्यांना अॅडजस्ट होऊच देत नाहीत.
वृद्ध लोकांच्या इच्छा, अपेक्षा, त्यांच्या गरजा, संवेदना त्यांचे प्रेम हे त्यांची अॅडजस्टमेंट करण्याची साधने आहेत. फक्त प्रेम आणि सन्मान याच्या मोबदल्यात ते आपले सर्वस्व अर्पण करतात आणि अॅडजस्ट व्हायचा प्रयत्न करतात.
अॅडजस्टमेंट ही प्रक्रिया माणसाच्या सुरवातीपासूनच आहे. बर्याच गोष्टी माणसाने अॅडजस्ट केल्यात आणि बर्याच गोष्टींनी माणसाला एडजस्ट करून घेतले आहे. निसर्गानेदेखील माणसालाच अॅडजस्ट केले आहे. त्याबद्दल दुमत नाही, पण माणूस शंभर टक्के अॅडजस्ट कधी होणार?
Adjustment
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…