मालेगावला डेंग्यू नियंत्रणासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

16 सक्रिय रुग्ण; तीन दिवसांत 10 हजार डेंग्यू चाचण्यांचे उद्दिष्ट

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव शहरात डेंग्यूचे 16 सक्रिय रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी तीन दिवसांत 10 हजार डेंग्यू चाचण्या करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाला देण्यात आले आहे. तसेच रुग्णांचे भौगोलिक मॅपिंग, दिवसा कंटेनर सर्वेक्षण, सायंकाळी धूरफवारणी आणि जलस्रोतांमध्ये गप्पी मासे सोडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
डेंग्यूच्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महानगरपालिका व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत आढावा घेतला. यावेळी महापौर शेख नसरीन बानो खालिद, स्थायी समिती सभापती एजाज बेग, नगर प्रशासन सहआयुक्त श्याम विठ्ठल गोसावी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थळे शोधण्यासाठी शहरात दिवसा कंटेनर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेले पाणी, पाण्याच्या टाक्या, भांडी व इतर जलसाठ्यांची तपासणी करून डासांच्या अळ्यांची उत्पत्ती रोखण्यावर भर देण्यात येणार आहे. सायंकाळी धूरफवारणीची मोहीम प्रभावीपणे राबवावी, तसेच आवश्यकतेनुसार जलस्रोतांमध्ये गप्पी मासे सोडावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या.
डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती तसेच त्यांच्या परिसरातील नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तापाची लक्षणे असलेल्या नागरिकांची वेळेत तपासणी व निदान व्हावे यासाठी शहरात ताप चिकित्सालये सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. चाचण्यांचे प्रमाण वाढवून संभाव्य रुग्णांचे लवकर निदान व उपचार करण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांना पाणी दीर्घकाळ साठवून ठेवण्याची वेळ येऊ नये, यासाठी किमान दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाणी साठवणुकीची भांडी पुन्हा भरताना
ती स्वच्छ धुणे, घराभोवती पाणी साचू न देणे आणि डेंग्यू प्रतिबंधाबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावरही भर देण्यात आला.

नागरिकांना प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनीही घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे. ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूची इतर लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरातील 16 डेंग्यूबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून, सर्व रुग्ण धोक्याबाहेर आहेत. दरम्यान, डेंग्यू नियंत्रणासाठी महानगरपालिका, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
-जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Administration in ‘action mode’ to control dengue in Malegaon.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *