सिडको : प्रतिनिधी
भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि पेंडंट दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना कल्पतरूनगर परिसरात घडली. या घटनेत 3 लाख 82 हजार 515 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. नीता बापू घोडके (वय 65, रा. मंजुळा बंगला, प्लॉट क्रमांक 69, कल्पतरूनगर, नाशिक) यांनी याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोडके या सायंकाळच्या सुमारास घरातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी पायी निघाल्या होत्या. त्या लेन क्रमांक दोन, लक्ष्मी बंगला, कल्पतरूनगर येथून जात असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून दोन अज्ञात
व्यक्ती आल्या.
दुचाकीवरील मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने घोडके यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओढून हिसकावली. या पोतीमध्ये सोन्याचे गोल पेंडंटही होते. दागिने हिसकावून घेतल्यानंतर दोन्ही संशयित दुचाकीवरून भरधाव वेगाने पसार झाले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 44 ग्रॅम 780 मिली ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असून, तिची अंदाजे किंमत 2 लाख 99 हजार 354 रुपये आहे. तसेच 12 ग्रॅम 440 मिली ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पेंडंटची किंमत 83 हजार 161 रुपये आहे. दोन्ही दागिन्यांची एकूण किंमत 3 लाख 82 हजार 515 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.घटनेनंतर घोडके यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास मुंबई नाका पोलिसांकडून
सुरू आहे.
Jewelry snatched from the neck of a woman who had stepped out to buy vegetables.