मनमाडसह देवळा, पेठ पोटनिवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

नाशिक : प्रतिनिधी
मनमाड नगरपरिषद तसेच देवळा आणि पेठ नगरपंचायतीतील रिक्त जागांसाठी होणार्‍या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेत निवडणूक यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.
दि. 20 जून 2026 रोजी होणारी मतदान प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सहआयुक्त श्याम गोसावी, सहाय्यक आयुक्त स्नेहल विसपुते यांच्यासह संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
मनमाड नगरपरिषदेतील दोन, देवळा नगरपंचायतीतील एक आणि पेठ नगरपंचायतीतील एक अशा एकूण चार रिक्त पदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. बैठकीत मतदान केंद्रांची तयारी, आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक साहित्य, प्रशिक्षण व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्य निवडणूक आयुक्तांंनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवरील उपाययोजनांची माहिती घेतली. मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, रॅम्प व दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रशासनिक तयारीची माहिती दिली, तर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सादर केली.

पोटनिवडणुकीचा आढावा

* मनमाड नगरपरिषद – 2 रिक्त जागा * देवळा नगरपंचायत – 1 रिक्त जागा

* पेठ नगरपंचायत – 1 रिक्त जागा *मतदान
दि. 20 जून 2026 * एकूण रिक्त पदे – 4

मतदान केंद्रांवर विशेष सुविधा

*पिण्याच्या पाण्याची व्यवस्था * वीज व स्वच्छतागृह सुविधा
*दिव्यांगांसाठी रॅम्प * संवेदनशील केंद्रांवर विशेष बंदोबस्त
* प्रशिक्षित मनुष्यबळ व साहित्य उपलब्धता

Administration ready for Manmad and Deola, Peth by-elections

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *