जनता दरबारातील तक्रारीची तातडीने दखल
सिन्नर : भरत घोटेकर
जनता दरबारात उपस्थित झालेल्या दोडी बुद्रुक येथील 100 टक्के दिव्यांग असलेल्या स्वाती राजाराम इघे या महिलेच्या घरकुलाच्या प्रश्नाची पंचायत समिती प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे.
सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी गुरुवारी (दि.30) स्वाती इघे यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि जागेसह घरकुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकार्यांकडे पाठवत कार्यतत्परता दाखवून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत असलेल्या स्वाती इघे यांना आजपर्यंत कोणत्याही शासकीय योजनेतून घरकुलाचा लाभ मिळालेला नव्हता. त्यातच घरकुल मंजूर झाले तरी बांधकामासाठी दोडी बुद्रुक येथे त्यांच्याकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली. रविवारी सिन्नर शहरातील ज्वालामाता लॉन्स येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या जनता दरबारात स्वाती इघे यांनी घरकुलाचा प्रश्न मांडला होता. त्यावेळी आमदार कोकाटे यांनी समाजकल्याण विभागांतर्गत तातडीने घरकुलाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना दिल्या होत्या. त्या सूचनांची तत्काळ अंमलबजावणी करत भवारी यांनी संबंधित महिलेची प्रत्यक्ष भेट घेऊन तिच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच स्थानिक ग्रामसेवकांना ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा विशेष बाब म्हणून घरकुलासाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय समाजकल्याण विभागाच्या 5 टक्के दिव्यांग आरक्षणातून घरकुल मंजुरीसाठी जागेसह प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकार्यांकडे पाठविण्यात आला. या तत्पर कार्यवाहीमुळे प्रशासनाने केवळ शासकीय प्रक्रिया गतीमान केली नसून सामाजिक बांधिलकीही जपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Administration rushes to the aid of a differently-abled woman.