व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराने भाविक त्रस्त; सुरक्षेचा बोजवारा
नाशिक : प्रतिनिधी
आदिशक्ती श्री सप्तशृंगीदेवीच्या नवरात्रोत्सवात गडावर सुरू असलेला नियोजनशून्य कारभार आणि प्रशासनाचा ढिसाळपणा भाविकांच्या जिवाशी खेळणारा ठरत आहे. सध्या गडावर दररोज 50 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. मात्र, देवस्थानचे प्रशासकीय अधिकारी आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे या गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र समोर आले आहे.
दर्शनासाठी तासन्तास रांगेत ताटकळलेल्या भाविकांचा संयम सुटल्यामुळे भाविक थेट 10 फुटांचे लोखंडी बॅरिकेट्स ओलांडून, लहान मुलांना कडेवर घेऊन गाभार्याच्या दिशेने उड्या मारत आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असतानाही प्रशासन डोळे मिटून बसले आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल होऊनही प्रशासनाने अद्याप
याची साधी दखलही घेतलेली नाही.
यंदा नवरात्रोत्सवाचे संपूर्ण नियोजन केवळ धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि मंदिर व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हातात एक केंद्रित झाले आहे. सध्या कोणतेही विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसल्याने इतर शासकीय यंत्रणांना किंवा स्वयंसेवकांना या नियोजनात सहभागी करून घेतले गेलेले नाही.
मंदिर व्यवस्थापक दहातोंडे हे त्यांच्या नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत.
इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला किंवा सहकार्यांना विश्वासात न घेता, मनमानी पद्धतीने कारभार हाकलत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. यापूर्वीही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले असून, त्याबाबतची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. चौकशीचा अंतिम निर्णय झालेला नसताना अशा वादग्रस्त व्यक्तीकडे पुन्हा गडाच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हीआयपी संस्कृती अन्? भाविकांचे हाल
सामान्य भाविक 10 फुटांच्या बॅरिकेट्सवरून उड्या मारून जीव धोक्यात घालून दर्शन घेत आहेत, तर दुसरीकडे नेते व मानकर्यांच्या नावाखाली व्यवस्थापकांच्या मित्रपरिवारासाठी निवास, दर्शन आणि भोजनाची विशेष व्यवस्था मनमानी पद्धतीने केली जात असल्याचा आरोप भाविकांमधून होत आहे. यापूर्वी दहातोंडे निलंबित असताना भगवान नेरकर यांनी नवरात्रोत्सवाचे शिस्तबद्ध व शांततेत नियोजन केले होते. त्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी त्यांचा सत्कारही केला होता.
जिल्हा न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी
गडावर एखादी चेंगराचेंगरी किंवा दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित करत, देवस्थान व वणी-सप्तशृंगगड गावाची बदनामी करणार्या व्यवस्थापकावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. सप्तशृंगगडावरील ही अव्यवस्था रोखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आता थेट जिल्हा न्यायालयाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण दर्शन व्यवस्था सोपवावी आणि गडावर तत्काळ सक्षम विश्वस्त मंडळाची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी भाविकांकडून केली
जात आहे.
Administrative chaos during Navratri festival at Saptashringgad