कालिका मातेच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
सिडको : प्रतिनिधी
नवरात्रोत्सवानिमित्त श्री कालिका मातेच्या दर्शनासाठी सिडको परिसरातून हजारो महिला आणि भाविक पहाटे तीन वाजल्यापासून मंदिराकडे जात आहेत. मात्र, परिसरातील रस्त्यांवरील दिवे पहाटे साडेपाच वाजताच बंद होत असल्याने अनेक ठिकाणी अंधार पसरतो. त्यामुळे दर्शनासाठी जाणार्या महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवरात्रोत्सव संपेपर्यंत तरी पथदीप सकाळी साडेसहापर्यंत सुरू ठेवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जुने सिडको, सावरकर चौक, महाराणा प्रताप चौक, लेखानगर, छत्रपती शिवाजी चौक, खोडे मळा, वृंदावन कॉलनी आणि इच्छामणी कॉलनी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पहाटे पथदीप बंद होत असल्याने भाविकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. पहाटेच्या वेळी रस्त्यांवर वर्दळ कमी असल्याने महिला आणि युवतींना टवाळखोरांचा त्रास होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात पहाटेपासूनच भाविकांची मंदिराकडे जाण्यासाठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती व्यवस्था करावी. प्रमुख रस्त्यांवरील पथदीप सुरू ठेवण्याबरोबरच प्रकाश व्यवस्थेची नियमित तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या उर्वरित काळात तरी सकाळी साडेसहापर्यंत पथदीप सुरू ठेवून भाविकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विजय कपिले, प्रसाद जाधव, सचिन बोरसे, वसंत लोखंडे, गणेश चिंचोरे, सुनील सोळुंकी, गणेश वझरे, नवनीत वझरे, रवी पवार, विशाल मुसळे, वाल्मिक बोरसे, प्रकाश ओगले, रवी जाधव आदींनी केली आहे.
Streetlights in CIDCO switched off at dawn