तेराशे गरजू रुग्णांना 9.81 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष ठरला गरिबांसाठी आधार

नाशिक : अश्विनी पांडे

आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांसाठी हतबल झालेल्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मोठा आधार ठरत आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात 21 मार्च 2025 रोजी सुरू झालेल्या या कक्षामार्फत अवघ्या एका वर्षात एक हजार 300 रुग्णांना तब्बल नऊ कोटी 81 लाख 83 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. ना वशिला, ना ओळख…इथे मिळते थेट मदत हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवत या उपक्रमामुळे शेकडो गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरू करण्यात आला. यापूर्वी आर्थिक मदतीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मंत्रालयात वारंवार जाऊन अर्ज सादर करणे, पाठपुरावा करणे आणि मंजुरीची प्रतीक्षा करावी लागत होती. या प्रक्रियेत जाणारा वेळ, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी जिल्हास्तरावरच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड, मेंदूचे आजार, तसेच इतर दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी पात्र रुग्णांना थेट आर्थिक मदत दिली जाते. अर्जाची छाननी करून प्रस्ताव तातडीने मुख्यमंत्री सहायता निधीकडे पाठविण्यात येतो आणि मंजुरीनंतर रुग्णांना निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे उपचारासाठी आर्थिक अडचण असलेल्या अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळत आहे. मार्च 2025 ते मार्च 2026 या कालावधीत मदतीचा आलेख सातत्याने वाढला. नोव्हेंबर 2025 पासून लाभार्थी आणि मदतीच्या रकमेत मोठी वाढ झाली. डिसेंबरमध्ये 196 रुग्णांना मदत मिळाली, तर मार्च 2026 मध्ये सर्वाधिक 211 लाभार्थींना एक कोटी 82 लाख 97 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचत आहे. या योजनेला केवळ शासकीय उपक्रम न ठेवता त्याचे लोकचळवळीत रूपांतर केले जात आहे. राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही अत्याधुनिक ऑनलाइन प्रणाली आणि डिजिटल पोर्टल्सचा वापर करत आहोत. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी राज्यभरात कम्युनिटी हेल्थ कॅम्प, आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष लोकसहभाग अशा विविध आयामांच्या माध्यमातून ही संकल्पना राज्याच्या कानाकोपर्‍यांत पोहोचवली जात आहे.
– रामेश्वर नाईक, प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष

Aid worth ₹9.81 crore for 1,300 needy patients

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *