शारदीय नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात
नाशिक : प्रतिनिधी
आश्विन शुद्ध प्रतिपदेला सोमवारी (दि.22) घरोघरी घटस्थापना करून नवरात्रोत्सव आणि स्त्रीशक्तीच्या पूजनाची सुरुवात झाली. घरोघरी कुळाचाराप्रमाणे आणि देवीच्या देवळांत भक्तिपूर्वक घटस्थापना केली गेली. काही ठिकाणी प्रत्यक्ष घटाची स्थापना असते, तर काही ठिकाणी अष्टभुजा देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या नऊ दिवसांत केवळ फलाहार, मौनव्रत, सप्तशतीचा पाठ पठण, असे अनेक आचारनियम पाळले जातात. मंदिरांत विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळांच्या देवीची जल्लोषपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी विविध मंदिरांत गर्दी केली होती.
शहरातील सातपूर परिसरातील सप्तशृंगी मंदिरात देवीची कुळाचाराप्रमाणे पूजा करत घटस्थापना करण्यात आली. ग्रामदैवत कालिकामाता मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी रीघ लावली होती. सर्वसामान्यांंसह मान्यवरांनी कालिकामातेचा आशीर्वाद घेतला. शहरातील सांडव्यावरची सप्तशृंंगीदेवी, भद्रकालीदेवी, दुर्गामाता मंदिर व पोपडादेवी या प्रमुख मंदिरांत मंत्रोच्चारात पूजा करण्यात आली. नवरात्रोत्सवामुळे नवचैतन्य जाणवत होते. बाजारपेठेलाही झळाळी आली आहे. खरेदीचा मुहूर्त साधत सोने खरेदी, गृहखरेदी, वाहन खरेदी केली.
गरबा नाइट्सची धूम
तरुणाईत गरबा दांडियाची उत्सुकता असते. शहरात गरबा नाइट्सला तरुण- तरुणींची चांगलीच गर्दी होते. शहरातील अनेक संस्था, फाउंडेशनकडून गरबा नाइट्सचे आयोजन करण्यात आले आहे. पावसामुळे यंदा सर्व गरबा नाइट्सचे कार्यक्रम वॉटरप्रूफ डोममध्ये घेण्यात आले.
मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम
शहरातील देवी मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीचा जागर, महाभिषेक, भजन व सप्तशतीचे पाठ आदी करण्यात आले.