काही दलालांनी स्वार्थातून राजकारण केल्याचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी
सोशल मीडियावर नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधील संभाव्य पक्षप्रवेशाला विरोध दर्शविणारी पोस्ट केल्यानंतर शहराच्या राजकारणात खळबळ उडाली.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 25) एन. डी. पटेल रोड येथील भाजप कार्यालयात मनसे, उबाठा आणि काँग्रेसमधील काही पदाधिकार्यांच्या पक्षप्रवेशावेळी हायव्होल्टेज ड्रामा रंगला. फरांदे यांच्या विरोधानंतरही प्रभाग तेरामधील मंडळींना भाजपात प्रवेश दिल्याने फरांदे यांनी भाजपा कार्यालयाकडे जाणे टाळले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, अशी माझी इच्छा होती. पक्षातीलच काही दलालांनी हे प्रवेश घडविले, असा आरोप केला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.
पक्षप्रवेश सोहळ्याला आमदार फरांदे यांनी उपस्थिती टाळली; मात्र माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे पहायला मिळाले. आपली भूमिका मांडताना त्यांना हुंदका दाटून आला. आज जे घडले ते मला अजिबात आवडले नाही. मला कोणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असेल तर जरूर पकडावे, मी कोणालाही घाबरत नाही. पण, या विषयात माझ्या भूमिकेसोबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी उभे राहायला हवे होते. तसे झाले असते तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश गेला असता, असे त्या म्हणाल्या.
फरांदे यांनी स्पष्ट केले की, आपली गिरीश महाजन यांच्यावर कोणतीही नाराजी नाही. त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. काही दलालांनी स्वार्थातून, आपल्याच घरातील काहींना तिकीट मिळावे, या हेतूने राजकारण केले. महाजनांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. प्रवेश झाला असला तरी उमेदवारी अंतिम नाही. निवडणूक प्रमुख म्हणून मला याची माहितीही नव्हती. प्रवेशाबाबत चर्चा करताना अवघे पाच-सहा जण बसले होते. पक्षाच्या वरिष्ठांनी या सार्या बाबींची दखल घ्यायला हवी. नेत्याचा बळी वेगळा, पण कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर त्याचे संकेत तळागाळात चुकीचे जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपली भूमिका स्पष्ट करताना फरांदे म्हणाल्या, मी आणि माझे कुटुंबीय संघर्ष करत कार्य करीत आहोत. विरोध करण्यापेक्षा आमदार म्हणून माझे मत असे होते की, त्या प्रभागातील सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा नुकताच पक्षप्रवेश झाला आहे. शेलार आणि पक्षाचे तीन असे पॅनल केले असते तर शंभर टक्के विजय मिळाला असता. बाहेरून एक उमेदवार आणि भाजपातील तीन उमेदवार दिल्यास पक्ष निश्चित विजयी होईल, असे चित्र असताना अचानक विनायक पांडे, शाहू खैरे, नितीन भोसले आणि यतिन वाघ यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मिळाल्यानेच ती पोस्ट टाकली होती, असेही त्यांनी सांगितले. सर्वांनाच नेते व्हायचे आणि प्रत्येकाने आपापले पाहायचे, मग पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पाठबळ कोण देणार? माझ्या डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर ते मला मान्य नाही, असे म्हणताना आमदार फरांदे पुन्हा भावूक झाल्या. दरम्यान, आज जे पक्षात प्रवेश केले आहे, त्यांचे पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी या नात्याने मी स्वागत करते, असे सांगत त्यांनी आपली भूमिका संतुलित असल्याचे स्पष्ट केले.
And A. Devyani Farande burst into tears.