चार चोरट्यांना अटक; तीन गुन्हे उघडकीस, 395 किलो तांब्याच्या तारा हस्तगत
नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात सोलर प्लांटवरील केबल चोरी करणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चार चोरट्यांना अटक करण्यात आली असून, सोलर प्लांट केबल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून 395 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, वाहनांसह सुमारे 7 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील न उघड चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने समांतर तपास सुरू ठेवत सोलर प्लांट केबल चोरी प्रकरणांचा छडा लावला.
मालेगाव, वडनेर खाकुर्डी व देवळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलर प्लांटवरील केबल चोरीचे गुन्हे घडले होते. आरोपी सोलर प्लांटवर लक्ष ठेवून केबल चोरी करून त्यातील तांब्याच्या तारा वेगळ्या काढून विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मालेगाव व सटाणा तालुक्यांतील आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये केशव गुलाब पवार (वय 32, रा. चौगाव, ता. बागलाण), गणेश कैलास गायकवाड (वय 21) व संजय भगवान गायकवाड (वय 30, दोघे रा. रावळगाव, ता. मालेगाव) तसेच भंगार खरेदी करणारा व्यापारी साबीर शहा इस्त्राईल शहा उर्फ गुफरान (वय 34, रा. आयशानगर, मालेगाव) यांचा समावेश आहे.
चौकशीत आरोपींनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या दोन व देवळा पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यात सोलर प्लांटवरील केबल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 395 किलो तांब्याच्या तारा (किंमत सुमारे 3 लाख 95 हजार रुपये), मारुती इको कार, बजाज मोटारसायकल व लोखंडी कटर असा एकूण 7 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी सोलर प्लांट चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई नाशिक ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, उपनिरीक्षक दत्ता कांभीरे, पोलीस अंमलदार व तांत्रिक पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.
Gang involved in solar plant cable theft in district arrested