संपादकीय

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे का?

काही दिवसांवर येणार्‍या होळी व धूलिवंदनाची धूम बच्चेकंपनीमध्ये आतापासूनच सुरू झाली आहे. होळीनिमित्त पाण्याने भरायचे फुगे आता दुर्मिळ झाल्याने गेल्या काही वर्षांपासून मुलांकडून जाडीने अत्यंत पातळ असणार्‍या पिशव्यांचा फुग्यांप्रमाणे वापर केला जात आहे. दरवर्षी होळीच्या अनुषंगाने अशा पातळ पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या पिशव्या फुटल्यावर त्यांचे तुकडे आहे तिथेच पडून राहतात. होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी रस्त्यांवर या पिशव्यांचा अक्षरशः खच पडलेला पाहायला मिळतो. याच पिशव्या हवेमुळे जवळच्या गटारांत आणि नाल्यांत जातात आणि पुढे जे व्हायचे तेच होते.
दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात या पिशव्या येतात कुठून, हा प्रश्न त्यावेळी सर्वांनाच पडतो. प्लास्टिक पिशव्यांविरुद्धच्या मोहिमेंंतर्गत सरकारी कर्मचारी विक्रेत्यांवर कारवाई करतात. मात्र, या कमी जाडीच्या पिशव्या ज्या ठिकाणी तयार केल्या जातात त्या कारखान्यांवर किंवा त्यांच्या घाऊक व्यापार्‍यांवर सरकारी अधिकार्‍यांकडून कारवाई केली गेल्याचे आजतागायत ऐकिवात नाही. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांविरुद्ध सरकारची अधूनमधून उघडली जाणारी मोहीम ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी असते की, केवळ दंडवसुलीतून महसूल मिळविण्यासाठी असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्यावाचून राहत नाही. 26 जुलै 2005 या दिवशी झालेल्या मुसळधार पावसाने सार्‍या मुंबईची तुंबई करून टाकली. मुंबई नगरीत आलेल्या या महापुराने शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. अनेकांच्या घरांत पाणी शिरून कोट्यवधी रुपयांची वित्तीयहानी झाली.
या महाप्रलयामागील कारणमीमांसा तपासताना अतिक्रमणामुळे मिठी नदीचे अरुंद होत चाललेले पात्र, नाल्यांच्या साफसफाईतील अनियमितता, स्थानिक लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांंसारख्या अनेक गोष्टींवर चर्चा झाली. नाल्यांचा साफसफाईतील मोठा अडसर असतो तो प्लास्टिकच्या पिशव्यांचा. या पिशव्या गटारांच्या जाळ्या निकामी करतात. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पातळ पिशव्यांचा पुनर्वापर शक्य होत नाही. गटारांच्या जाळ्यांना असे पातळ प्लास्टिक चिकटल्यास पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाणी बराच काळ बाहेर तुंबून राहते. जमिनीच्या तळाशी प्लास्टिक चिकटून राहिल्यास पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होतात. कचर्‍याच्या ढिगार्‍यातून अन्न शोधताना बर्‍याचदा प्लास्टिकच्या पिशव्या जनावरांच्या पोटात जातात. त्यामुळे त्यांचा जीवही जातो. पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या संदर्भात नैसर्गिकरीत्या कुजण्याची किंवा नष्ट होण्याची प्रक्रिया होत नसल्याने
वर्षोनुवर्षे या पिशव्या तग धरून राहतात त्यामुळे अशा पातळ पिशव्यांवर बंदी घालणेच इष्ट असल्याचे लक्षात येऊन राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कायद्याने बंदी घालण्यात आली. बंदी येताच सरकारच्या वतीने भरारी पथकांची नेमणूक करून प्लास्टिक पिशव्यांचे स्रोत असलेल्या किराणा मालाच्या, फळांच्या, भाज्यांच्या दुकानांवर छापे टाकून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आणि त्या देणार्‍या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामधून सरकार दरबारी लाखोंचा महसूल गोळा झाला. सरकारच्या अन्य मोहिमांप्रमाणे ही मोहीमही काही दिवसांनी थंड पडली. पातळ पिशव्या पुन्हा बाजारात भाजी, फळे, मासे विक्रत्यांकडे दिसू लागल्या. कालांतराने कोणीतरी न्यायालयात याचिका दाखल करून, सरकार दरबारी निवेदने देऊन किंवा विरोधी पक्षाच्या निदर्शनास आणून देऊन राज्यात प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचे कसे तीनतेरा वाजले आहेत ही बाब निदर्शनास आणून देते आणि पुन्हा एकदा सरकार खडबडून जागे होते. पुन्हा नव्याने कारवाईला सुरुवात होते.
2005 पासून आजतागायत प्लास्टिक पिशव्यांसह समस्त प्लास्टिक वस्तूंवर 6-7 वेळा बंदीची मोहीम उघडण्यात आली असून, सहाही वेळा ही मोहीम काही कालावधी चालल्यानंतर पुन्हा बंद पडली आहे. 1 जुलै 2022 पासून राज्यात प्लास्टिक (काही अपवाद वगळता) आणि थर्माकोल यांवर कायमस्वरूपी बंदी आणण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी प्लास्टिकचा ’प’ सुद्धा माहीत नसणार्‍या जगाला आज प्लास्टिकशिवाय जगणेही कठीण वाटू लागले आहे. त्यामुळे प्लास्टिकवरील बंदी यशस्वी होईल का, याविषयी त्यावेळीच लोकांच्या मनात संभ्रम होता.
सरकारच्या वतीने प्लास्टिकच्या सर्व वस्तूंना पर्यायही सुचविण्यात आले होते. त्यादरम्यान कापडी पिशव्यांना भलतेच महत्त्व प्राप्त झाले होते. पानाच्या टपर्‍यांपासून, वर्तमानपत्र विक्रेत्यांपासून ते हार्डवेअरच्या दुकानांपर्यंत सर्वत्र कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र त्यावेळी पाहायला मिळत होते. ही मोहीमसुद्धा अपेक्षेप्रमाणे काही काळानंतर थंडावली. आजमितीला किराणा मालाचे दुकान, भाजीविक्रेता, फळविक्रेता, मटण विक्रेता, कापड विक्रेता, भांडी विक्रेता आदी सर्वांकडे प्लास्टिकच्या पातळ पिशव्या ग्राहकांना न मागताही मिळू लागल्या आहेत. रेल्वे आणि एसटीमध्ये येणारे खाद्यपदार्थ आणि भाजी-फळ विक्रेतेही 10-15 रुपयांच्या खरेदीवर या पातळ पिशव्या सहजपणे लोकांना बहाल करू लागले आहेत.
प्लास्टिक पिशव्यांविरुद्धची मोहीम यशस्वी करण्यासाठी विक्रेते आणि ग्राहक यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. ग्राहक सोबत कापडी पिशव्या बाळगत नसल्याने लहानसहान वस्तूंच्या खरेदीनंतरही विक्रेत्यांकडून पिशवीची मागणी करतात. ग्राहक नाराज होऊन अन्य दुकानांत खरेदीसाठी जाऊ नये म्हणून विक्रेतेही ग्राहकांना देण्यास परवडतील अशा हलक्या दर्जाच्या आणि कमी जाडीच्या पिशव्या दुकानांत ठेवतात.
ग्राहकांची मागणी आणि विक्रेत्यांचा नाइलाज यामुळे प्लास्टिक पिशव्यांना सध्यातरी बाजारात मरण नाही. गरज आणि पुरवठा या समांतर चालणार्‍या बाबी असून, गरज घटली किंवा नष्ट झाली की पुरवठाही आपसूकच थांबतो, या न्यायाने प्लास्टिकच्या पिशव्यांची जनमानसांत निर्माण झालेली गरज आज थांबवली गेली पाहिजे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास कारणीभूत असणार्‍या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याच्या दृष्टीने व्यापक जनप्रबोधन काळाची गरज असून, त्यासाठी संबंधित सरकारी खात्यांसह सेवाभावी, सामाजिक आणि निसर्गप्रेमी संस्थांनी पुढाकार घेण्याची आज नितांत आवश्यकता आहे, अन्यथा येणार्‍या काळात 26 जुलैपेक्षा मोठा प्रलय पाहावा लागेल.

Are plastic bags banned?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

6 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

7 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

7 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

7 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

7 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

7 hours ago