डॉ. संजय धुर्जड.
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
डॉ. गौरव गांधी यांचे अकाली निधन जितके वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक होते, तितकेच वैद्यक शास्त्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारेही होते. ते स्वतः एक डॉक्टर असूनही त्यांच्यावर अशी वेळ आली, तशीच वेळ इतर क्षेत्रातील लोकांवरही आली असल्याचे तुम्ही बघितलं असेल, किमान ऐकलं तरी असेल.
माझ्या मागील दोन लेखांना वाचकांनी प्रतिसाद देत त्यांचे अनुभव आणि काही घटनांबद्दल कळविले. याचा अर्थ असा की, असे होणे काही नवीन राहिले नाही.
कमी वयात हृदय विकार आणि हृदय विकाराचा झटका येऊ शकतो, विशेषतः कोविड महामारीनंतर तर या आजाराचा उद्रेक झाला आहे, असेही म्हणता येईल. २५ – ३० वर्षांपूर्वी उच्च रक्तदाब (हाय बीपी), मधुमेह (डायबेटीस), हृदय विकार (हार्ट अटॅक) असे आजार वयाच्या पन्नाशी नंतर सुरू व्हायचे, हार्ट अटॅक तर साठीनंतरच येतात, असा त्यावेळची मान्यता होती.
परंतु, एकविसाव्या शतकात आता चित्र बदलायला लागले आहे. हे आजार फक्त वाढताय असे नाही, तर ते ऐन तारुण्यात दिसू लागले आहेत. याचे कारणं काय असावीत? आपण कुठे गाफील आहोत का? वैद्यक शास्त्राच्या मर्यादेमुळे होतंय का? की आपली बदललेली जीवनशैली याला कारणीभूत आहेत की अजून काही आहे? असे अनेक प्रश्नांचे उत्तरं शोधावी लागतील.
रक्तदाब आणि तणावाचा काही संबंध आहे का? याचा तरुणाईवर काही परिणाम होतोय का? आपण बघतो की हल्लीची तरुण पिढी ही त्यांच्या व्यावसायिक जीवनात अतिव्यस्त असतात, त्याचप्रमाणे स्पर्धात्मक वातावरणात वावरतात. व्यस्त असणे म्हणजे फास्ट फूड आणि जंक फूड खाणे होते, त्यात अधिक सोडियम, प्रिजरव्हेटिव्हज आणि चव वाढवण्यासाठी केमिकलचा वापर केलेला असतो. व्यस्त असतात म्हणून व्यायाम आणि आरामासाठी वेळ नाही, झोप कमी. तणावपूर्ण वातावरणात असल्यामुळे मद्यपान आणि धुम्रपणाचे प्रमाणही तरुणांमध्ये वाढत चालले आहे. यात आता मुलीही मागे राहिलेल्या नाहीत. या सवयी वेळेत बंद नाही केल्या तर उच्चरक्तदाबाचा त्रास कमी वयातच सुरू होतो.
लक्षात ठेवा “Retention of Tension is Hyoertension”, अर्थात, तणाव टिकवणे म्हणजे उच्च रक्तदाबाला आमंत्रण”. तणावग्रस्त परिस्थिती तुमचे बीपी वाढवते, ज्यामुळे शरीरात तणाव संबंधी काही हॉर्मोन्स अधिक प्रमाणात उत्सर्जन होते. ते हॉर्मोन्स शरीराला घातक असते, महत्वाचे अवयव हळू हळू पोखरले जातात. हृदय, मेंदू, किडनी, लिव्हर यावर अधिक दुष्परिणाम होतात.
आपल्या आहाराचे काय झाले आहे बघा ना? विशेषतः शहरी भागांत बदललेली जीवनशैली नक्कीच आपल्याला या आजारांच्या जवळ घेऊन चालली आहे. आपला आहार कसा आहे, विचार करा ना. फास्ट फूड, जंक फूड, हाय कॅलरी डाएट, साखरेचा अतिवापर, तेल तूप व स्निग्ध पदार्थांचे सेवन, खारी-बेकरी पदार्थ, कलर इसेन्स आणि प्रिजरव्हेटिव्हज टाकलेले व प्रक्रिया केलेले पॅकिंग मधील खाद्य पदार्थ, अतिघातक कीटकनाशक फवारलेल्या भाज्या व कृत्तिम रित्या पिकवलेल्या फळांचे सेवन केल्याने शरीराला हानी होणारच ना.
त्यात भर म्हणून मद्य सेवन, धूम्रपान, आमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढते आहे. जसे आपल्या गाडीत रॉकेल मिश्रित पेट्रोल टाकले तर इंजिन खराब होते, त्याच प्रमाणे शरीरातील हृदय, लिव्हर, किडनी, मेंदू, फुपुस, रक्तवाहिन्या या महत्वाच्या अवयवांना इजा होणारच. आपण आपल्या गाडीत टाकण्यासाठी चांगले पेट्रोल आणि ऑइल कुठे मिळते याचा शोध घेऊन ते गाडीत टाकतो, मग आपल्या शरीरात का विष आणि विषारी पदार्थ टाकताय? कारण ते आपल्याला विनामूल्य मिळाले आहे, म्हणून का? विचार करा…
नियमित तपासणी करणे, हा एक उत्तम पर्याय आहे. मग नियमितपणे काय काय तपासावे, आणि कुणाकडून तपासावे. मला वाटते की पंचविशी पासूनच नियमित आरोग्य तपासणी करणे शहाणपणाचे ठरेल.
१. रक्तदाब – आपल्या फॅमिली फिजिशियन कडून नियमित बीपी चेक करावा. डोके दुखणे, चक्कर येणे, अंधारी येणे, थकवा येणे, दम लागणे असे लक्षणे असल्यास स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवावे. वजन कमी करा, जेवणात मीठ कमी करा, व्यायाम सुरू करा, जेवणात योग्य तो बदल करा. स्निग्ध व तळण पदार्थ कमी करून शाकाहार करा, जेवणात पालेभाज्या, फळभाज्या, फळे वाढवा.
२. कुटुंबात किव्हा जवळच्या नात्यात बीपी, शुगर, आणि हार्टचा त्रास असल्यास तुम्हालाही तो आनुवंशिक पद्धतीने हस्तांतरित हळू शकतो, म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे. अचानकपणे हार्ट अटॅक येऊन निधन झाले असल्यास (सडन कॅरडीएक अरेस्ट) तर विशेष काळजी घ्यावी, कारण यामुळे तुम्हालाही असे काही होण्याची शक्यता वाढते.
३. रक्त तपासणी – तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित रक्त तपासणी करावी. रुटीन ब्लड टेस्ट (नेहमी करण्याच्या तपासण्या) किमान वर्षातून एकदा तरी कराव्या. त्याचप्रमाणे, हार्ट संबंधी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिपिड प्रोफाइल टेस्ट ही कराव्या. यात कोलेस्टेरॉल, ट्राय-ग्लिसराईड, एच.डी. एल, एल.डी.एल., व्ही.एल.डी. एल. असे विविध प्रकार आहेत. कोलेस्टेरॉल आणि ट्राय-ग्लिसराईड मुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीची गाठ तयार होऊन हार्ट अटॅक येतो. एच.डी.एल. चांगले असते म्हणून त्याचे प्रमाण अधिक असावे, तर एल.डी. एल. घातक असते म्हणून त्याचे प्रमाण कमी असावे.
४. मानसिक स्वास्थ्य – वरील सर्व तपासण्या आणि टेस्ट करून आपण शरीरातील बदल जाणून घेऊ शकतो. परंतु मानसिक तणावामुळे शरीरात आणि शरीरावर होणाऱ्या बदलांना जाणून घेण्याचे कुठलेही साधन आज आपल्याकडे नाही. म्हणून आपला तणाव (स्ट्रेस) आपणच ओळखावा. कुठले दडपण असेल, कुठल्या गोष्टीची किव्हा एखाद्या व्यक्तीची खूप काळजी करतोय, भीती वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, निराश / उदास वाटत असेल, रडू येत असेल, झोप लागत नसेल तर आपल्यावर तणाव आहे असे समजावे, व योग्य मार्गदर्शन घ्यावे. जवळच्या व्यक्तीशी बोलावं, त्यांना सांगून आपलं मन मोकळं करावं. अनेक दिवसांपासून मनात काही असेल तर ते बोलून व्यक्त करावं. लक्षात ठेवा, शारीरिक आजार बरा तो लक्षात येतो, पण मानसिक तणाव तुम्हाला आतल्या आत पोखरतो, बाहेरून कळत नाही.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. शरीर काही रातोरात खराब होत नाही. ते तुम्हाला अधून मधून काही संकेत देत असते. अचानकपणे हार्ट अटॅक येऊन दगावलेल्या रुग्णांना काहीतरी तर त्रास झालेला असेल. ते सूक्ष्म संकेत ओळखा आणि वेळेत काळजी घ्या, तपासणी करा, सल्ला घ्या, आणि गरज पडल्यास उपचार सुरू करा. निष्काळजीपणा अंगलट येतो, हे मी आता वेगळे सांगायला नको.
हे शरीर ।म्हणजे एक अद्भुत आणि चमत्कारी मशीन आहे. त्याला धोका होणार नाही आणि ते धोका देणारही नाही, फक्त आपण स्वतः त्याच्याशी प्रामाणीक असायला हवं. शरीराला जे हवं तेच दिलं पाहिजे, जे फायद्याचे आहे ते खावे जे त्रासदायक आहे ते बंद करावे. आपल्याला जीवनात जे काही साध्य करायचे आहे, ते या शरीराच्या माध्यमातूनच साध्य होणार आहे, हे समजून घ्या. म्हणूनच, हे शरीरच नसेल तर, तुमच्या इच्छा, अपेक्षा, गरजा, तुमचे स्वप्न, ध्येय, टार्गेट्स, तुमच्या भविष्याची तरतूद, तुमचे आर्थिक नियोजन, बँक बॅलन्स, इस्टेट, प्रॉपर्टी, तुमचे आईवडील, पती/पत्नी, मुलं, नातेवाईक… वगैरे वगैरे सर्व काही निरर्थक आणि शून्य होते. म्हणून शरीराला जपा, त्याची काळजी घ्या, व तुम्हाला मनुष्यजन्म देऊन हे शरीर दिले म्हणून त्या दैवी शक्तीबद्दल कृतज्ञ रहा.(क्रमशः)
|