१. रक्तदाब – आपल्या फॅमिली फिजिशियन कडून नियमित बीपी चेक करावा. डोके दुखणे, चक्कर येणे, अंधारी येणे, थकवा येणे, दम लागणे असे लक्षणे असल्यास स्पेशालिस्ट डॉक्टरांना दाखवावे. वजन कमी करा, जेवणात मीठ कमी करा, व्यायाम सुरू करा, जेवणात योग्य तो बदल करा. स्निग्ध व तळण पदार्थ कमी करून शाकाहार करा, जेवणात पालेभाज्या, फळभाज्या, फळे वाढवा.
२. कुटुंबात किव्हा जवळच्या नात्यात बीपी, शुगर, आणि हार्टचा त्रास असल्यास तुम्हालाही तो आनुवंशिक पद्धतीने हस्तांतरित हळू शकतो, म्हणून सतर्क राहणे आवश्यक आहे. अचानकपणे हार्ट अटॅक येऊन निधन झाले असल्यास (सडन कॅरडीएक अरेस्ट) तर विशेष काळजी घ्यावी, कारण यामुळे तुम्हालाही असे काही होण्याची शक्यता वाढते.
३. रक्त तपासणी – तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित रक्त तपासणी करावी. रुटीन ब्लड टेस्ट (नेहमी करण्याच्या तपासण्या) किमान वर्षातून एकदा तरी कराव्या. त्याचप्रमाणे, हार्ट संबंधी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लिपिड प्रोफाइल टेस्ट ही कराव्या. यात कोलेस्टेरॉल, ट्राय-ग्लिसराईड, एच.डी. एल, एल.डी.एल., व्ही.एल.डी. एल. असे विविध प्रकार आहेत. कोलेस्टेरॉल आणि ट्राय-ग्लिसराईड मुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीची गाठ तयार होऊन हार्ट अटॅक येतो. एच.डी.एल. चांगले असते म्हणून त्याचे प्रमाण अधिक असावे, तर एल.डी. एल. घातक असते म्हणून त्याचे प्रमाण कमी असावे.
४. मानसिक स्वास्थ्य – वरील सर्व तपासण्या आणि टेस्ट करून आपण शरीरातील बदल जाणून घेऊ शकतो. परंतु मानसिक तणावामुळे शरीरात आणि शरीरावर होणाऱ्या बदलांना जाणून घेण्याचे कुठलेही साधन आज आपल्याकडे नाही. म्हणून आपला तणाव (स्ट्रेस) आपणच ओळखावा. कुठले दडपण असेल, कुठल्या गोष्टीची किव्हा एखाद्या व्यक्तीची खूप काळजी करतोय, भीती वाटत असेल, अस्वस्थ वाटत असेल, निराश / उदास वाटत असेल, रडू येत असेल, झोप लागत नसेल तर आपल्यावर तणाव आहे असे समजावे, व योग्य मार्गदर्शन घ्यावे. जवळच्या व्यक्तीशी बोलावं, त्यांना सांगून आपलं मन मोकळं करावं. अनेक दिवसांपासून मनात काही असेल तर ते बोलून व्यक्त करावं. लक्षात ठेवा, शारीरिक आजार बरा तो लक्षात येतो, पण मानसिक तणाव तुम्हाला आतल्या आत पोखरतो, बाहेरून कळत नाही.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. शरीर काही रातोरात खराब होत नाही. ते तुम्हाला अधून मधून काही संकेत देत असते. अचानकपणे हार्ट अटॅक येऊन दगावलेल्या रुग्णांना काहीतरी तर त्रास झालेला असेल. ते सूक्ष्म संकेत ओळखा आणि वेळेत काळजी घ्या, तपासणी करा, सल्ला घ्या, आणि गरज पडल्यास उपचार सुरू करा. निष्काळजीपणा अंगलट येतो, हे मी आता वेगळे सांगायला नको.
हे शरीर ।म्हणजे एक अद्भुत आणि चमत्कारी मशीन आहे. त्याला धोका होणार नाही आणि ते धोका देणारही नाही, फक्त आपण स्वतः त्याच्याशी प्रामाणीक असायला हवं. शरीराला जे हवं तेच दिलं पाहिजे, जे फायद्याचे आहे ते खावे जे त्रासदायक आहे ते बंद करावे. आपल्याला जीवनात जे काही साध्य करायचे आहे, ते या शरीराच्या माध्यमातूनच साध्य होणार आहे, हे समजून घ्या. म्हणूनच, हे शरीरच नसेल तर, तुमच्या इच्छा, अपेक्षा, गरजा, तुमचे स्वप्न, ध्येय, टार्गेट्स, तुमच्या भविष्याची तरतूद, तुमचे आर्थिक नियोजन, बँक बॅलन्स, इस्टेट, प्रॉपर्टी, तुमचे आईवडील, पती/पत्नी, मुलं, नातेवाईक… वगैरे वगैरे सर्व काही निरर्थक आणि शून्य होते. म्हणून शरीराला जपा, त्याची काळजी घ्या, व तुम्हाला मनुष्यजन्म देऊन हे शरीर दिले म्हणून त्या दैवी शक्तीबद्दल कृतज्ञ रहा.(क्रमशः)