ज्ञानोबा माउलींच्या शब्दातून
– सुप्रिया सुरवाडे
जीवन सुंदरच आहे , पण ते अधिक सुंदर होतं जर सोबतीला भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांसारखे ग्रंथ असतील. किती विशेष बारकाईने भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी निर्माण झाली असेल. म्हणजे प्रत्येक शब्दात मानवी जीवन किती तंतोतंत अधोरेखित केलेले आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी जीवनाला लागू होतेच. कालच ज्ञानेश्वरी ओवीचं चिंतन सुरू होतं. ओवी वर पाहता समजणार नाही. त्यासाठी प्रत्येकच शब्दाच्या अंतरंगात उतराव लागेल.
म्हणुनी असता धीरू गेला ।
हृदया द्रावों आला ।
जैसा चंद्रकळी शिवतला । सोमकांतु ॥
अर्जुनाला सर्व आप्तेष्ट पाहून झालेला मोह आणि त्या मोहामुळे स्व अस्तित्वच तो कसा विसरला याबद्दल विवेचन करताना उत्मोत्तम उदाहरणे देऊन अगदी अचूकपणे स्पष्ट करत आहेत. एखादा तपस्वी आपल्या तपश्चर्येचे बळावर सिद्धी मिळवतो, पण बुद्धिभ्रंश झाल्याने तो जसे सर्व विसरतो. अर्जुनाचंही काहीस तसंच झालं.
अंतःकरणात कारुण्य निर्माण झाले, धनुर्धर मोहाने ग्रस्त झाला. अंतरी असलेला धीर गेला, हृदय द्रवित झाले, जणू एखादा सोमकांत मनी चंद्रकिरणांनी स्पर्शला तर तो वितळून जातो… स्वतःलाच गमावून बसतो… स्वअस्तित्वच हरवून बसतो.. अगदी असच अर्जुनाच्या बाबत झाले… यातून फार मोलाचा अर्थबोध मिळतो की कुठल्याही प्रभावात पाझरने मान्य नसते… म्हणजे काय कुठल्याही गोष्टीच्या अती आहारी जाणे धोक्याचे असते… अनेकदा आपल्याला आपलं सर्वस्व गमवावं लागतं… म्हणून माणसाने सावध असायला हवे… स्वतःच्याप्रति जागरूक असायला हवे… वाहवत जाऊन स्वतःचा घात होण्याआधी सावरायला हवे… मात्र, इथे अर्जुन सावध आहे, त्याला माहीत आहे मी मोहित झालो आहे, असं तो स्वतःच श्रीकृष्णाला खेदाने सांगत आहे.. आपण मात्र पूर्णच भ्रमित असतो, बुद्धी मोहाने झाकळून गेलेली असते. त्यामुळे आपल्याला योग्य अयोग्य समजून येत नाही… आपणही वेळीच सावध झालो पाहिजे… आणि आपल्या कर्तव्याच्या दिशेने पुन्हा पाऊल टाकायला हवे…
Arjun