चोरट्यांच्या मारहाणीत तिघे जखमी
पंचवटी/ दिंडोरी : प्रतिनिधी
ढकांबे (ता. दिंडोरी) गावात सोमवारी (दि.23) पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास मनोहर धात्रक यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यावेळी कुटुंबातील व्यक्तींना गंभीर मारहाण करून सोन्याची पोत, कानातील सोन्याचे कुडके यांच्यासह काही रोकड घेऊन संशयित फरार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ढकांबे गावात सोमवारी पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान धात्रक कुटुंबीयांच्या घरावर दरोडा टाकला. मनोहर धात्रक यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी जवळच वसंत धात्रक आणि अशोक बोडके यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला असता, तेथील शेतकरी जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढत मनोहर बारकू धात्रक यांच्या घरावर दरोडा टाकला. धात्रक यांच्या घराच्या मागील बाजूचा दरवाजाची आतील कडी जोराने तोडून घराच्या आत प्रवेश करून ताराबाई मनोहर धात्रक, सुरेश मनोहर धात्रक, मनोहर बारकू धात्रक यांना हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात सुरेश धात्रक यांच्या डोक्यात काहीतरी हत्याराने मारून त्यांना गंभीर जखमी केले, तर मनोहर धात्रक यांच्या डोळ्याला आणि ताराबाई धात्रक यांच्याही डोक्याला, हाताला गंभीर दुखापत केली. त्यानंतर चोरट्यांनी सत्तर हजार रुपयांचे दोन सोन्याच्या मणी असलेल्या पोत प्रत्येक अंदाजे पाच ग्रॅम, दहा हजार रुपयांचे कानातील सोन्याचे कुडके अंदाजे एक ग्रॅम यासह अडीच ते तीन लाखांची रोकड असा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज खुळे यांच्यासह हवालदार विश्वनाथ काकड आदी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रकरणाचा दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज खुळे तपास करीत आहेत.
दोन वर्षांचा मुलगा वाचला
धात्रक कुटुंबीय पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत असताना दरोडा पडल्याची घटना घडली. घरात तीन मोठे, तर सुरेश धात्रक यांचा एक दोन वर्षांचा मुलगा असे चार जण झोपलेले होते. पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास घराच्या मागील बाजूच्या दरवाजा चोरट्यांनी लाथ मारून आतील कडी तुटून दरवाजा उघडला. दोन रूममध्ये हे कुटुंब गाढ झोपेत होते. एका रूममध्ये सुरेश आणि त्याचा मुलगा होता. तो दोन वर्षांचा मुलगा ब्लँकेट घेऊन खाली झोपला असल्याने तो वाचला, तर पलंगावर सुरेश धात्रक झोपले असल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर काहीतरी हत्याराने वार केल्याने ते तसेच पडून राहिले. यात मात्र दोन वर्षांचा मुलगा मात्र बालंबाल वाचला.
…अन् मनोहर धात्रक पळत सुटले
धात्रक यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील तिघांनाही जबर मारहाण केली. त्यानंतर चोरटे घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन फरार झाले. घरातील वयस्कर असलेले मनोहर धात्रक यांच्या डोळ्याला जबर मार लागलेला असतानाही ते घराबाहेर येत त्यांच्या घराच्या बाजूला 100 मीटर असलेल्या घराकडे पळत सुटले आणि आवाज देत चोर आले चोर आले म्हणून ओरडू लागले. तेव्हा शेजारचे उठल्याने त्यांच्यासह इतरांना रुग्णालयात उपचारासाठी नेले.
अपयशानंतर तिसर्या ठिकाणी दरोडा
ढकांबे गावात चोरट्यांनी एकाच वेळी तीन ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला मनोहर धात्रक यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या वसंत धात्रक आणि अशोक बोडके यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. तेथे अपयश आल्यानंतर चोरट्यांनी वसंत धात्रक आणि अशोक बोडके यांच्या घराला कडी लावली. त्यावेळी तेथील शेतकरी उठून आजूबाजूला चोरट्यांचा तपास आजूबाजूला करत होते. त्यावेळी चोरट्यांनी मनोहर धात्रक यांचे घर लक्ष्य केले अन् तिथे दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी घरातील छोटी कोठी, एक छोटी पेटी व काही वस्तू घरापासून काही अंतरावर टाकून पळ काढला.
जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार
ढकांबे येथे टाकलेल्या दरोड्यात धात्रक कुटुंबातील ताराबाई धात्रक, सुरेश धात्रक आणि मनोहर धात्रक हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ताराबाई धात्रक व मनोहर धात्रक यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. सुरेश धात्रक यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.