सहा दरोडेखोरांनी वृद्ध दांपत्याकडून लाखांचा ऐवज लुटला
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील गणोरवाडी येथे सहा अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी एका घरावर धाडसी दरोडा टाकत वृद्ध दांपत्याला शस्त्रांचा धाक दाखवून तब्बल 7 लाख 10 हजार 250 रुपयांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तलवार, लोखंडी कोयता आणि छर्यांच्या बंदुकांसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी घरात घुसून दांपत्याला ओलीस धरले आणि घरातील ऐवज घेऊन पोबारा केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. 2 नोव्हेंबर) रोजी रात्री 7.45 ते 10 वाजेदरम्यान गणोरवाडी येथील शेतगट क्रमांक 64 मध्ये ही घटना घडली. संजय भास्कर पिंगळ (वय 59) हे पत्नी निर्मला यांच्यासह घरी असताना सहा दरोडेखोर आले. चौघांनी संजय पिंगळ यांना, तर दोघांनी त्यांच्या पत्नीला पकडून तलवार, चाकू व कोयत्याचा धाक दाखवला. त्यानंतर घरात जबरदस्तीने प्रवेश करून कपाट, शोकेस, पलंग तसेच दांपत्याच्या अंगावरील दागिने जबरीने लुटले.
या दरोड्यात 5 लाख रुपये किमतीचे 11.5 तोळे सोन्याचे दागिने, 35 हजार 250 रुपयांचे चांदीचे दागिने, 1 लाख 30 हजार रुपयांची रोकड आणि 45 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 7 लाख 10 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 310(2), 312, 331(6), 127(2) व हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक बी. एच. मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या धाडसी दरोड्यामुळे गणोरवाडीसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दाम्पत्याला कोंडले बंद खोलीत
दरोडेखोरांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचा डीव्हीआरदेखील सोबत नेला. दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी संजय पिंगळ आणि त्यांच्या पत्नीला घरातील एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावली. मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) सकाळी त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Armed robbery in Dindori, carried out by brandishing weapons