मंत्री सामंत : नाशिक, दिंडोरी लोकसभेचा घेतला आढावा
नाशिक : प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या द़ृष्टीने नाशिक जिल्ह्यात जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या जागा निवडून आणून जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. यासाठी गट, गटनिहायप्रमाणे पक्षाच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोचवून शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करावे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपर्कमंत्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.6) नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यांनी पक्षाची भूमिका मांडत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख सुहास कांदे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.
यावेळी सामंत म्हणाले, की जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती करण्याला आमचे प्राधान्य असेल. मात्र, महायुतीतील प्रत्येक पक्षाला त्याची ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच आम्ही जिल्ह्यात संघटन जास्तीत जास्त प्रमाणात वाढवणार आहोत. त्याकरिता प्रभागनिहाय, तालुकानिहाय माहिती पदाधिकार्यांकडून घेतली. संपर्कमंत्री म्हणून नाशिकची जबाबदारी आपल्याकडे आहे. महायुतीत समन्वय समिती असून, त्यासाठी तीनही पक्षांचे प्रमुख आहेत. लाडकी बहिणींना लवकरच पैसे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शिवसेनेने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन आगामी जिल्हा परिषद ते पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे दाखवून दिले आहे.
पक्षात गट-तट नाही
पक्षात कुठलेही गट-तट नाही. येत्या निवडणुकीला आम्ही एकसंघपणे सामोरे जाणार आहोत. निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. याशिवाय पराभूत उमेदवारांचीदेखील संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
निधीसाठी कुठलीही अडचण नाही
नाशिक महापालिकेत निवडून आलेल्या शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोणाही नगरसेवकाला निधीची अडचण येणार नाही. मुळात ज्या खात्यांतर्गत निधी दिला जातो ते खाते शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.
हिंदीसक्तीविषयी माहिती नाही
राज्य शासनाने शासकीय कर्मचारी आणि अधिकार्यांसाठी हिंदीसक्तीचा निर्णय घेतल्याच्या प्रश्नी मंत्री सामंत यांना विचारले असता, त्यांनी याबाबत आपल्याला माहिती नसून, माध्यमांतूनच यासंदर्भात समजले आहे. याप्रश्नी भाषा संचालनालयाशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौदा हजार कोटींची गुंतवणूक
नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी 14 हजार कोटींची गुंतवणूक केली होती. 142 सामंजस्य करार केले होते. दरम्यान, नाशिकमध्ये महिंद्रा समूह गुंतवणूक करणार असल्याने यामुळे दहा ते पंधरा हजार रोजगार उपलब्ध होतील, असे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेतल्या चुका टाळू
नाशिक महापालिका निवडणुकीत आमच्याकडून ज्या चुका झाल्या त्या आम्ही टाळण्याचा प्रयत्न करू. जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त आमचे उमेदवार कसे निवडून जातील यासाठीच नियोजन असेल.
Army focuses on organizational strength for Z.P.