सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
जेलरोड परिसरातील दसकगाव येथे एका 40 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पती, सासू-सासर्‍यांसह सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील गणेश गोपाळराव वाळके यांची बहीण आशा हिचा विवाह 2008 मध्ये दसकगाव येथील प्रवीण साहेबराव घोटेकर याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुखाचा गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये चारचाकी गाडी आणि फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला गेला.
बहिणीचा संसार वाचावा, या उद्देशाने गणेश वाळके यांनी आपल्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून ही रक्कम दिली होती. आईच्या निधनानंतर, तू वारसा हक्क का सोडला, असे विचारत तिला मारहाण
करण्यात आली.
तसेच आईचे 21 तोळे सोन्याचे दागिनेही सासरच्यांनी काढून घेतले. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पती प्रवीण घोटेकर याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याबद्दल विचारणा केली असता सासू-सासरे आणि दिराने तिलाच घरातून हाकलून देण्याची धमकी दिली. बुधवारी (दि. 6 मे) सकाळी 7 च्या सुमारास आशा दरवाजा उघडत नसल्याचा फोन तिच्या भावाला आला. कुटुंबीय नाशिकला पोहोचण्यापूर्वीच आशा हिचा मृत्यू झाल्याचे बिटको रुग्णालयात समजले.
घरात सुरू असलेल्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे भाऊ गणेश वाळके यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रवीण साहेबराव घोटेकर (पती), साहेबराव सावळीराम घोटेकर, लताबाई साहेबराव घोटेकर, राजेंद्र साहेबराव घोटेकर, चित्रा राजेंद्र घोटेकर आणि आरती गोसावी यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास उपनिरीक्षक पावरा तपास
करत आहेत.

Married woman commits suicide due to harassment by in-laws

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *