गोविंदनगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

विकत पाणी घेण्याची नागरिकांवर वेळ

सिडको ः विशेष प्रतिनिधी
गोविंदनगर परिसरात गेल्या वर्षभरापासून पाणीपुरवठ्याची कृत्रिम टंचाई जाणवत असून, अत्यल्प वेळ व कमी दाबाने येणार्‍या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील वेगाने विकसित होणार्‍या या भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने रहिवाशांना टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत आहे. परिणामी दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पाणीसाठा करता येत नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असतानाही महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे गोविंदनगर परिसरातील न्यू इरा शाळा व आसपासच्या भागात वारंवार पाणीपुरवठा खंडित होत आहे. अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या तसेच खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी सुविधा कुलकर्णी, मनोज कुंभारे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे. गोविंदनगर परिसरात न्यू इरा शाळा, नवकार हॉस्पिटल व इतर ठिकाणी सुमारे तीस वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या चार इंची पाईपलाईनवर सध्या संपूर्ण पाणीपुरवठ्याचा भार आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहिल्याने लोकसंख्या वाढली असून त्यानुसार जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याचे चित्र आहे. या परिसरात स्वतंत्र जलकुंभ उभारणे तसेच जुन्या जलवाहिन्या बदलण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने या भागात तातडीने सर्वेक्षण करून नवीन जलवाहिन्यांचे काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.

गोविंदनगर परिसरात केवळ चार इंची पाईपलाईन असल्यामुळे अनेक घरांपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. परिणामी नागरिकांना महागड्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असून पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा.
– मंगल तांबडे, स्थानिक रहिवासी

 

Artificial water shortage in Govindnagar area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *