आठवणीतली माणसं…

माणूस गरीब असला तरी चालेल, पण तो मायाळू असावा. जीव लावणारा असावा. अशा माणसाच्या सहवासात जीवन प्रवास सुखकर होतो. आपण कितीही दूर गेलो तरीही आठवणीच्या कप्प्यात ही माणसे नेहमी साद घालतात.
पतीच्या शिक्षकी पेशाच्या नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचे कोकण समजल्या जाणार्‍या पेठ तालुक्यातील मुरुमहट्टी या लहानशा आदिवासी पाड्यावर छोट्या बाळाला घेऊन राहण्याचं धारिष्ट्य केलं. खूप धाकधूक होती. ऐकीव गोष्टींवरून अनेक गैरहजर मनात होते. सुरुवातीला ही माणसंही दुरूनच असायची, पण जसे आम्ही त्यांच्यात मिसळायला सुरुवात केली तसे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन होऊ लागले. येथील माणसं फार मायाळू आहेत. गुरुजींचा परिवार म्हणून काळजी घ्यायचे. आपुलकीने चौकशी करायचे. शेतातल्या, रानातल्या भाज्या मिळायच्या. रानातल्या काही भाज्या कशा करायच्या त्यांच्याकडून शिकले. उडदाचे वरण, नागलीच्या भाकरी, भात बर्‍याचदा त्यांच्याकडून यायचा.
मुलाचा पहिला वाढदिवस आमचे मोजके नातेवाईक व मित्रपरिवार आणि येथील प्रेमळ माणसांच्या सोबतीने पाड्यावर झाला. सगळ्यांना वाढदिवसाची उत्सुकता.. पहिल्यांदाच पाहत असावे. तेथील पद्धतीचे तांबे, डिश, वाट्या भेटवस्तू रूपात दिल्या. आजही त्यातील काही मी जपून ठेवल्या आहे. आठवण म्हणून..
निसर्गाची मुक्तहस्ते उधळण येथे झाली आहे. साग, पळस आणि इतर वृक्षराजीने पावसाळ्यात तर निसर्ग अधिकच बहरतो.रानफुलांनी सजतो. सहज फिरायला म्हणून बाहेर पडावे आणि करवंदाच्या जाळीने लक्ष वेधून घ्यावे. हिरव्याकंच कैर्‍यांनी तोंडाला पाणी सुटावे असा हा रानमेवा..
येथील माणसांनी नातं जपून ठेवलं. त्यांच्या मुलांच्या लग्नाला खासकरून बोलावतात. नुकतेच बर्‍याच वर्षांनी तिकडे जाणं झालं. तीच आपुलकी.. तीच माया. कुसुमवहिनी आणि एकनाथभाऊंना काय करू अन् काय नको असे झाले. आम्ही दोघेही चहा घेत नाही म्हटल्यावर सकाळी सकाळी वाटीत मध दिले. आम्ही आश्चर्यचकीत, कारण इकडे औषध म्हणूनही नैसर्गिक मध मिळत नाही. स्पेशल पाहुण्यांसाठी राखून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. खूप दिवसांनी चुलीवरचे वरण, भाजी, भाकरी, लसूण व कैरीची चटणी साधे पण चविष्ट जेवण… अतिशय आग्रहाने व प्रेमाने..तो आनंद व चव पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही.
घराच्या मागे परसबाग. फळं व फुलांची झाडे. अबोली सर्वांगाने फुललेली. वहिनींनी फुले तोडून सुंदर गजरा माझ्यासाठी गुंफला. सर्वांत सुंदर भेट म्हणजे अबोलीचा भरगच्च मोठाच मोठा गजरा…रस्त्यावर असलेल्या पाटीलबाबांच्या मळ्याकडे गाडी वळवली. शिकून नोकरीसाठी बाहेर गेलेली त्यांची मुलं सुटीत घरी आली होती. आम्हाला भेटल्यावर अजूनही गुरुजी आपल्याला विसरलेले नाही याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता… वानोळा म्हणून तांदूळ, उडदाची डाळ, आंबे आणि सोबतीला पुन्हा येण्याचा खूप आग्रह…
आपल्या पद, प्रतिष्ठेचा बाऊ केला नाही तर दिखाऊ, मतलबी वाटणार्‍या या जगातही माणुसकी झरा वाहताना दिसतोय आणि तोच आनंद मनाला सुखावतोय.
-सविता दिवटे-चव्हाण

Ashvini Pande

Recent Posts

जिल्हा बँकेची ओटीएस योजना गदारोळात मंजूर

बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…

2 days ago

महिलांच्या तुलनेत केवळ 4 टक्के पुरुषांची नसबंदी

ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…

2 days ago

महापालिका निवडणुकीत ‘वंचित’ कुणासोबत जाणार?

शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…

2 days ago

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

2 days ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

2 days ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

2 days ago