पोलिसाने चाकूने वार केलेल्या सासऱ्याचा मृत्यू
सिन्नर
नाशिक ग्रामीण पोलिस दलात मनमाड येथे कार्यरत असलेल्या सुरज उगलमुगले या पोलिस कर्मचार्याने स्वतःची पत्नी, सासू व सासर्यावर चाकूने सपासप वार करुन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील दोडी येथे शुक्रवारी (दि.8) रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोर पोलिस कर्मचारी त्याच्या साथीदारासोबत फरार झाला असून तिघा जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र गंभीर जखमी झाल्याने सासरे निवृत्ती सांगळे यांचे उपचारा दरम्यान निधन झाले
दोडी बुद्रुक येथील निवृत्ती दामोदर सांगळे व शिला निवृत्ती शिंदे यांची मुलगी पूजा हे हिच्यासोबत पोलिस कर्मचारी सुरज उगलमुगले याचा विवाह झाला होता. त्यांना सात महिन्यांचा मुलगा आहे. दोघे पती-पत्नी उपनगर नाशिक येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात गुढीपाडव्याच्या सणासाठी बाळा समवेत पूजा दोडी येथे माहेरी आली होती. शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुरज एका साथीदाराला सोबत घेऊन कारमधून शेळके वस्ती वरील सांगळे यांच्या घरी आला. तेथे पूजाला तुला काल नाशिकला यायला सांगितले होते का आली नाहीस असे विचारत भांडण उकरून काढले व हातातील चाकूने तिच्यावर वार करू लागला. यावेळी पूजाला व तिच्या बाळाला वाचवण्यासाठी शीला सांगळे मधे पडल्या तर सुरजने त्यांच्याही मानेवर व हातावर चाकूने वार केले. निवृत्ती सांगळे यांच्यावरही चाकूने वार करत उगलमुगले व त्याच्यासोबत साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. वस्तीवरील आजूबाजूच्या लोकांनी जखमी अवस्थेतील तिघांनाही दोडी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र अति रक्तस्राव झाल्यामुळे सासरे निवृत्ती सांगळे यांचे उपचार सुरू असताना निधन झाले याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते व त्यांचे सहकारी याप्रकरणी तपास करीत आहेत.
मनमाडच्या पोलिसाकडून पत्नी, सासू, सासर्यावर चाकूने सपासप वार